परभणी/गंगाखेड (Parbhani) :- तालुक्यातील झोला पाटीजवळ सोमवार १० फेब्रुवारी रोजी रात्री अंदाजे ९:३० वाजेच्या सुमारास कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात मृतकाविरुद्ध अपघाताचा (Accident) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालकाचा ताबा सुटून कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड येथून पिंप्रीकडे जाणारी एमएच ४३ एआर ९३०७ स्विफ्ट डिझायर कार १० फेब्रुवारी रोजी रात्री अंदाजे ९:३० वाजेच्या सुमारास झोला पाटीजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या खडीच्या ढिगारावर गेल्याने चालकाचा ताबा सुटून कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात कृष्णा अच्युतराव भिसे वय ४० वर्ष रा. पिंप्री व पप्पू अच्युतराव डुबे वय २८ वर्ष रा. बलसा हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात (Hospital)दाखल केले असता निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश शाहू, परिचारिका पल्लवी माने, शितल पांचाळ यांनी प्रथमोपचार करत कृष्णा अच्युतराव भिसे वय ४० वर्ष रा. पिंप्री यास मृतक घोषित केले व जखमी पप्पू अच्युतराव डुबे वय २८ वर्ष रा. बलसा यास पुढील उपाचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. याप्रकरणी मयताचे चुलत भाऊ दशरथ शिवाजीराव भिसे वय ३६ वर्ष रा. पिंप्री ता. गंगाखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवार रोजी सकाळी गंगाखेड पोलीस ठाण्यात (Police station)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि शिवाजी सिंगणवाड हे करीत आहेत.