परभणी(Parbhani) :- जिल्हा परिषदेच्या(zilla parishad) अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास योजनेंतर्गत परभणी तालुक्यातील काही गावात अभियंत्यांच्या साखळीद्वारे कामांविनाच कोट्यवधी रुपयांची बिले उकळण्याचा खेळ केला जात असल्याची तक्रार आमदार राजेश विटेकर यांनी पुराव्यासह गुरुवार १६ जानेवारी रोजी केली. तक्रार दाखल केल्या पाठोपाठ राज्याच्या अल्पसंख्यांक मंत्र्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
आ.राजेश विटेकरांनी तक्रार दाखल करताच मंत्र्यांनी घेतली दखल
विकासकामांच्या नावाखाली मंजूर झालेली कामे न करताच एजन्सीधारक आणि अभियंत्यांनी कागदोपत्रीच कामे उरकून कोट्यवधी रुपयांची बिले उचलण्याचा प्रकार केल्यावरून परभणी पंचायत समिती, जिल्हापरिषद व बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या विरोधात आमदार विटेकर यांनी अल्पसंख्यांक मंत्री दत्ता भरणे यांना भेटून पुराव्यासह लेखी तक्रार दाखल केली आहे. परभणी तालुक्यातील पेडगाव, टाकळी, किन्होळा, पाथरा या गावात अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वतीने जवळपास तीन कोटी रुपयांची विकास कामे मंजूर झाली होती. मात्र दलालांनी प्रत्यक्षात कामे न करताच थेट बनावट कागदपत्रे तयार केली, या कामात अधिकार्यांना चक्क भागीदार बनविले. बनावट मोजमाप पुस्तिका, संचिका, कामे पूर्ण झाल्याचे दाखले तयार करून चक्क जिल्हाधिकारी यांच्याकडे निधी मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आमदार विटेकर यांनी ही बाब लेखी तक्रारीद्वारे मंत्र्यांच्या निदर्शणास आणून दिली.
बिले निघण्यापूर्वी हा कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला
पंचायत समिती गटविकास अधिकारी, बांधकाम विभागातील अधिकारी, जिल्हा परिषदचे पंचायत विभागातील अधिकारी यांनी संबंधित दलालासोबत आधा तुम्हारा आधा हमारा, असा प्रकार करण्याचा प्रकार केला, असा आरोप विटेकरांनी केला आहे. काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे बिले निघण्यापूर्वी हा कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला, असे स्पष्ट करीत आमदार विटेकर यांनी प्रत्यक्षात जागेवर कोणतीच कामे नाहीत, कागदपत्रे मात्र तयार, असे प्रकार करून अधिकारी आणि एजन्सीधारक असलेल्या दलालांनी जिल्ह्यात अंधाधुंद कारभार चालू असल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी अल्पसंख्यांक मंत्री भरणे यांनी लक्ष घालून मंत्रालय स्तरावरून चौकशीचे आदेश बजावल्यामुळे या घोटाळ्याचा निकाल लागणार, असे दिसत आहे.