परभणी शहरातील नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हा
पोलीस प्रशासनाचे आवाहन
पोलीस प्रशासनाचे आवाहन
परभणी (Parbhani Police) : शहरात झालेल्या संविधान शिल्प विटंबनेनंतर विविध राजकिय पक्षांचे नेते, पदाधिकारी भेटी देत आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात गर्दी होत आहे. त्यामुळे शहरात अफवा पसरल्या जात आहेत. परिणामी व्यापारी भितीने दुकाने लागलीच बंद करत असल्याने नागरीकांत भितीचे वातावरण पसरले जात आहे.
परभणी शहरात मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची एका माथेफिरुने विटंबना केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर दुसर्या दिवशी परभणी बंद पुकारण्यात आला.बंदला हिंसक वळण लागल्याने जमावाने काही दुकानाची तोडफोड करुन जाळपोळ केली. त्यामुळे व्यापार्यांचे नुकसान झाले. मात्र जिल्हा प्रशासन आणि (Parbhani Police) पोलिस प्रशासनाने वेळीच परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या सर्वत्र शांतता आहे. घटनेच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी भेट देऊन पाहणी करत आहेत. त्यामुळे पुतळा परिसरात संबंधित नेत्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमा होत आहेत. मात्र याबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. शुक्रवार १३ डिसेंबर रोजी सायंकाळी अचानक वसमत रोड, नारायण चाळ व इतर भागातील दुकाने बंद झाली. त्यामुळे नागरीकांची धावपळ झाली.
अफवांवर विश्वास ठेवू नये -जिल्हाधिकारी गावडे
परभणी शहरात सर्वत्र (Parbhani Police) पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र कुणाचा तरी मृत्यू झाल्याची अफवा पसरली. मात्र यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक व संबंधित यंत्रणाशी संपर्क साधला. अशी कोणतीही घटना झाली नाही. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, अफवा पसरविणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिला आहे.