परभणी/सेलू (Parbhani) :- मोरगाव रस्त्यावर ज्ञानाई गुरुकुल परिसरात मोरेगाव येथील दुधना नदीपात्रातून अवैध वाळूचे (Illegal sand) वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीसांनी १७मार्च रोजी दुपारी तीन वाजता पकडले असून चालकासह इतर दोन जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टरचे हेड, ट्रॉली आणि वाळू असा २ लाख ६५हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२ लाख ६५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त तीन जणावर गुन्हा दाखल
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू -मोरेगाव रस्त्यावर ज्ञानाई गुरुकुल परिसरात दुधना नदी पात्रातून शासनाचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने अवैधरित्या वाळूची चोरटी विक्री करण्यासाठी १७ मार्च रोजी दुपारी तीन वाजता वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीस पथकाने ताब्यात घेतले. एक लाल रंगाचे महिंद्रा कंपनी ५७५ डी आय ट्रॅक्टर हेड किंमत २ लाख रुपये, ट्रॅक्टरला जोडलेली लाल निळ्या रंगाची ट्रॉली किंमत ६० हजार रुपये व एक ब्रास वाळू किंमत ५ हजार रुपये असा २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस नायक माधव कांगणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमानुसार समीर शेख ,निखिल पहाडे राहणार सेलू, वैभव आनंदे राहणार हदगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत. दरम्यान पोलीसांनी जप्त केलेले हेड, ट्रॉली आणि वाळू यापैकी पोलीस ठाण्यात ट्रॉली आणि त्यामधील वाळू आढळून आली आहे. ट्रॅक्टरचे हेड नेमके कोठे गेले याची माहिती मात्र मिळू शकली नाही.