परभणी (Parbhani Regional Office) : जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रिय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या कक्षात बुधवार २४ जुलै पर्यंत जिल्हाभरातून एकूण २२४ आवेदने प्राप्त झाली आहेत. यापैकी केवळ ८६ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तर अर्ध्यापेक्षा अधिक म्हणजेच ११८ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची गतीमानता वाढणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न, शासन स्तरावरील विविध कामे, वेळोवेळी प्राप्त होणारी आवेदने यावर जलद गतीने कार्यवाही व्हावी तसेच प्रशासनात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतीमानता यावी यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांकडून मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेली निवेदने, दैनंदिन अर्ज, संदर्भ आदी या कक्षात स्विकारली जातात. नागरीकांची सोय व्हावी यासाठी जिल्हास्तरावर या कक्षात अर्ज सादर केल्या जातात. अर्धन्यायिक स्वरुपाचे अर्ज, संदर्भ आणि शासकीय कर्मचार्यांचे आस्थापना सेवेसंदर्भातील आवेदन या कक्षात स्विकारले जात नाहीत.
एकूण अर्ज 224, राज्यस्तरावरील विषय 20
मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची २२ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापना करण्यात आली. कक्षात आलेली अर्ज, संदर्भ आणि निवेदनांवर जिल्हास्तरावर कार्यवाही करण्यात येते. जिल्हास्तरीय प्रकरणे संबंधीत विभाग प्रमुखाकडे वर्ग करून त्यावर कार्यवाही केले जाते. तसेच ज्या प्रकरणांवर राज्यस्तरावरून, शासन स्तरावरून कार्यवाही होणे अपेक्षित होणे अशी वैयक्तिक, धोरणात्मक संदर्भ आणि निवेदने मुख्यमंत्री सचिवालयाचे अपर मुख्य सचिवांना सादर करण्यात येतात. त्यानुसार जिल्हाभरातील एकूण २० प्रकरणे राज्यस्तरावर पाठविण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी आणि डोंगरी भागात या कक्षाची माहिती होणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे. विविध तालुक्यातील नागरीकांचे विकास कामाच्या संदर्भातील तक्रारी, समस्या, शेती, नागरी विकास आदी तक्रारींचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी या कक्षाची मदत होते. मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना केल्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांना विविध निवेदने व संदर्भासाठी मंत्रालय, मुंबई येथे जाण्याची आता गरज उरली नाही. या कक्षात अर्ज सादर केल्यास तो मंत्रालय स्तरावर पाठविण्यात येतो. तसेच या कक्षात प्राप्त होणार्या अर्ज, विनेदने आणि संदर्भ अर्जांची पोच पावती संबंधीतांना देऊन हे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत विभागाकडे पाठविण्यात येतात. प्रशासनात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यासाठी तसेच नागरीकांना आपल्या जिल्ह्यातच तक्रारींचे, निवेदनांचा निपटारा व्हावा यासाठी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष महत्वाची भुमिका बजावतो.
निवासी उपजिल्हाधिकारी पदसिध्द विशेष कार्य अधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय पक्षाचे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी या कक्षाच्या पदसिध्द विशेष कार्य अधिकारी आहेत. तर कक्षाचे कामकाज पाहण्यासाठी एक नायब तहसीलदार, एक लिपीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.