परभणी/गंगाखेड(Parbhani):- काळ्या जादूने तुमच्या मुलाची मुद्दत बांधलेली विलाज केला नाही तर एक महिन्याच्या आत तो मरण पाऊ शकतो “त्याचा आजार मी बरा करतो” असे म्हणत विलाज कामी व अघोरी पुजेसाठी चार लाख एकोण चाळीस हजार पाचशे रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार शहरात घडला असून याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील तिघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात दि. २८ जून शुक्रवार रोजी जादूटोणा प्रतिबंध (Prevention of witchcraft)अधिनियमाच्या कलमांसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड संत जनाबाई नगरातील रहिवासी असलेल्या एका ४४ वर्षीय व्यक्तीच्या मुलास नेहमी गुडघे दुःखी, डोके दुःखी, अंग सुजणे आदी प्रकारच्या शारीरिक व्याधींचा त्रास (trouble)असल्याने त्याचेवर रुग्णालयात उपचार(Treatment) सुरू होते. उपचार करून ही आजार कमी होत नसल्याने पाहुण्यांच्या सांगण्यावरून दि. २८ मे २०२२ रोजी त्यांनी मुलास उपचारासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपुर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयात ओळख झालेल्या विठ्ठल रामचंद्र सोळंके नामक व्यक्तीने त्याच्या ओळखीतील कुकाजी भिमराव मिसाळ रा. अंजनी खुर्द ता. लोणार जि. बुलढाणा हा तुमच्या मुलाचा विलाज करू शकतो तुम्ही मुलास त्याच्याकडे उपचारासाठी घेऊन जा, असे म्हणत कुकाजी मिसाळ यास सुलतानपूर येथील दवाखान्यात बोलावून घेतले. कुकाजी मिसाळ याने घरी घेऊन जात. मुलाला एकट्यालाच खोलीत नेऊन पंधरा मिनिटांनी मुलाला घेऊन बाहेर येत मुलावर काळी जादू(black magic) केली आहे.
इलाज केला नाही तर एक महिन्याच्या आत तो मरण पाऊ शकतो..!
काळ्या जादूने तुमच्या मुलाची मुद्दत बांधलेली असून इलाज केला नाही तर एक महिन्याच्या आत तो मरण पाऊ शकतो. मी त्याला पूर्णपणे बरा करतो असे म्हणत विश्वास(Trust) संपादन करून त्याच दिवशी तात्पुरत्या उपचाराच्या नावाखाली २५ हजार रुपये फोन पे वर घेत तुमच्या मुलावर झालेली काळी जादू थोडी फार उतरविल्याचे सांगत यापुढील उपचार दर महिन्याला तुमच्या गावी गंगाखेड येथे येवून मी करतो असे म्हणत दि. ३ जून २०२२ रोजी कुकाजी भिमराव मिसाळ व त्यांचा पुतण्या अभिषेक भास्कर मिसाळ, संजय काळे हे अजनी खुर्द ता. लोणार येथून पाच किलो लिंबू, २१ काळ्या छोट्या बाहुल्या, मृगजळ, उलटा रावण, काळा हिरवा मोहनजाळ, काळा कपडा, काळी तीळ, राळ, कापूर, जनार्दन उद, हळदी, कुंकू, सुई व दाभण अशा जडीबुटीच्या काही वस्तू घरी घेवून आलो असे म्हणत आणलेल्या वस्तू दाखवत त्या वस्तू व काळ्या छोट्या बाहुल्यांना सुया दाभण टोचून मुलाच्या अंगावरून त्याचा उतारा केला.
पौर्णिमेला अघोरी पुजा करून पशु बळी देणे आहे असे सांगून रोख ५० हजार रुपये घेतले
त्यानंतर अंगात असलेली आग कमी होत असल्याचे मुलाने सांगितल्याने यातूनच कूकाजी मिसाळ यांनी विश्वास संपादन करून दर महिन्याला एक उतारा असे बारा उतारे करावे लागतील असे म्हणत दि. २९ ऑगस्ट २०२२ रोजी कुकाजी मिसाळ व त्यांचा मावस भाऊ संजय काळे घरी आले. तुमच्या मुलाला पूर्ण चांगलं करण्यासाठी येणाऱ्या पौर्णिमेला अघोरी पुजा करून पशु बळी देणे आहे असे सांगून रोख ५० हजार रुपये घेतले. विलाज करण्यासाठी तसेच अघोरी पुजेसाठी म्हणत कुकाजी भिमराव मिसाळ, त्यांचा मुलगा संकेत कुकाजी मिसाळ व पुतण्या अभिषेक भास्कर मिसाळ यांनी वेगवेगळे कारण सांगत दि. २८ मे २०२२ ते दि.१२ ऑक्टोबर २००२३ दरम्यान फोन पे वर दोन लाख चार हजार पाचशे रुपये (२०४५०० रू.) व दोन लाख पस्तीस हजार रुपये (२३५००० रू.) रोख असे एकुण चार लाख एकोण चाळीस हजार पाचशे रुपये (४३९५०० रू.) कोणतेही उपचार न करता विश्वास संपादन करून अन्यायाने घेत फसवणूक केल्याची फिर्याद दिल्यावरून दि. २८ जून शुक्रवार रोजी बुलढाणा जिल्ह्यातील वरील तिघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंध अधिनियमाच्या कलमांसह फसवणुकीचा गुन्हा(Crime of Fraud) दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर हे करीत आहेत.