परभणी (Parbhani) :- राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता १२ वी बोर्डाची लेखी परीक्षा मंगळवार ११ फेब्रुवारी पासून सुरूवात होणार असून जिल्ह्यामध्ये ७१ परीक्षा केंद्रांवर (Examination Centres) तब्बल ३८ हजार ६५८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत.
दरवर्षी फेब्रुवारी – मार्चमध्ये १० वी व १२ वी परीक्षांचे आयोजन केल्या जाते. यावर्षी प्रशासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी कंबर कसली असून मोठ्या प्रमाणात शिक्षण विभागाच्या (Department of Education) वतीने परीक्षेचे नियोजन केले गेले आहे. जिल्ह्यामध्ये २३७ महाविद्यालयातील २७ हजार २३० नियमित विद्यार्थी तर इतर ११ हजार ४२८ विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत. या परीक्षांसाठी मोठया प्रमाणात प्रशासनाच्या वतीने तयारी केली असून मुख्यमंत्र्यांच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियान या निर्धाराची अंमलबजावणी प्रभावीपणे जिल्ह्यात व्हावी, यासाठी नियोजन केले आहे.