परभणी/गंगाखेड(Parbhani):- तालुक्यातील सुनेगाव – सायळा जवळील इंद्रायणी नदी पात्रात बुधवार रोजी सायंकाळी बुडालेल्या इसमाचा मृतदेह गुरुवार रोजी सकाळी राबविलेल्या शोध मोहिमेत मिळून आला. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची(sudden death) नोंद करण्यात आली.
सुनेगाव – सायळा जवळील इंद्रायणी नदी पात्रातील घटना
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी गंगाखेड शहरातील धनगर गल्लीतील रहिवासी मेंढपाळ अशोक धोंडीराम ताटे वय ३२ वर्ष हा तरुण मेंढ्या बसविण्यासाठी खुले शेत आहे का पाहण्यासाठी सहकाऱ्यांसोबत सुनेगाव – सायळा शिवारात बुधवार दि. ३० ऑक्टोबर रोजी गेला होता. सायंकाळी ४:३० ते ५ वाजे दरम्यान सुनेगाव – सायळा जवळील इंद्रायणी नदी पात्रातील पाण्यात अशोक धोंडीराम ताटे हा तरुण बुडाल्याची घटना घडली. याची माहिती मिळाल्यानंतर गंगाखेड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Inspector of Police) सिद्धार्थ इंगळे, पोलीस जमादार दिपककुमार वावळे, पोलीस पाटील विष्णू सूर्यवंशी आदींनी इंद्रायणी नदीकडे धाव घेतली मात्र अंधार झाल्याने व पाण्यात पोहणारे मच्छिमार न मिळाल्याने गुरुवार ३१ ऑक्टोबर रोजी गंगाखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना व दुस्सलगाव येथील मच्छिमारांना पाचारण करण्यात आले.
मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल
दुस्सलगाव येथील मच्छिमार परमेश्वर कचरे, अर्जुन कचरे, नामदेव कचरे, भानुदास कचरे, विठ्ठल ईदरुके आदींनी गुरुवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळपासून इंद्रायणी नदी पात्रात शोध मोहीम राबवून पाण्यात बुडालेल्या अशोक धोंडीराम ताटे या तरुणाचा मृतदेह शोधून सकाळी ९ वाजेच्या सुमारास पाण्याबाहेर काढला. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी मयत तरुणाचा मेव्हणा नवनाथ तुकाराम ढेंबरे वय २२ वर्ष रा. खरबडा ता. पूर्णा यांनी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. यांचा पुढील तपास पोलीस जमादार दिपककुमार वावळे करीत आहेत.