परभणी/गंगाखेड (Parbhani):- आम्ही पोलीस आहोत, तु गांजा विकतोस, आम्हाला पैसे दे, असे म्हणत एका शेतकर्याजवळील २२ हजार रुपये बळजबरीने काढून घेण्यात आले. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास गंगाखेड – परभणी रोडवरील संत जनाबाई कमानीजवळ घडली. या प्रकरणी दोन अनोळखींवर गंगाखेड पोलिसात गुन्हा (crime)दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड – परभणी रस्त्यावरील घटना दोन अनोळखींवर गुन्हा दाखल
मारोती कुकडे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे छत्रपती नगर येथून सायकलवर परभणी रोडने येत असताना दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखींनी त्यांना थांबविले. संबंधितांनी आम्ही पोलीस आहोत, असे म्हणत ओळखपत्र दाखविले. तु गांजा विकतो, तु आम्हाला पैसे दे असे म्हणाले. शेतकर्याने माझ्याजवळ पैसे नाहीत, असे उत्तर दिल्यानंतर संबंधित इसमांनी शेतकर्याजवळील २२ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. दुचाकीवर बसून संबंधित इसम पळून गेले. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.