परभणी (Parbhani) :- जिंतूर तालुक्यात मार्च महिन्याच्या मध्यापासून उन्हाच्या झळाचा जोर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे तापमानाचा(Temperature) पाराही चढू लागला असून गुरुवार २० मार्च रोजी जिंतूर शहराचे कमाल तापमान चक्क 39 अंश सेल्सीयसपर्यंत जाऊन पोहोचले आहे. तर उन्हाच्या तीव्रतेचा आलेख वर चढत असल्याने नागरिकांच्या जीवाची चांगलीच लाहिलाही होत आहे. दुपारी या झळांची तीव्रता असह्य ठरु लागल्याने घरातील बंदावस्थेतील कुलर, ए.सी. सुरू झाल्या आहेत.
तडाखा जोर वाढत असल्याने कुलर, ए.सी. सुरू
तालुक्यात मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महिन्याच्या शेवटी असह्य झळांनी जिंतूरकर अक्षरशः हैराण झाले आहेत. एरवी मार्च महिन्याच्या सुरुवातीस काही प्रमाणात वातावरण थंड असते म्हणून नागरीक खुशाल असतात पण वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत आहे. नागरिक उकाड्यापासून काही काळ विश्रांतीसाठी शितपेयांचा आधार घेतांना दिसत आहे. नागरिकांना दिवसा असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. तर रात्रीच्यावेळीही कुलर, ए.सी. शिवाय झोप येणे अवघड होऊन बसले आहे. म्हणून घरामधील बंदावस्थेतील कुलर, ए.सी. यांची दुरुस्ती करण्यावर नागरिकांचे भर दिसत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये नागरिकांना मे महिन्याचे अनुभव येऊ लागले आहे. शिवाय वाढत्या शहरीकरणात आणि विकास योजनांत वृक्षतोड झाल्याने उन्हाळ्यात दिलासा देणारी हिरवळच मिळेनाशी झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट बनत चालली आहे. परिणामी वातावरणात कमालीचा उकाडा निर्माण होत आहे. सूर्य देवता ही मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी चांगलाच कोपला असून मार्च महिन्यातच उन्हाचा पारा 39 अंशावर जाऊन बसल्याने नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत आहे.