परभणी (Parbhani) :- पाथरी शहरात खळबळ उडवून देणाऱ्या अनंता टोम्पे खून (Murder) प्रकरणातील मुख्य आरोपींना अवघ्या २४ तासांत अटक करत पोलिसांनी दिलेला शब्द पाळला असून, त्यांच्या जलद आणि परिणामकारक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मृताच्या शरीरावर गंभीर स्वरूपात मारहाण झाल्याच्या खुणा
१५ एप्रिल रोजी शहरातील न.पा. सुलभ स्वच्छतागृहात अनंता टोम्पे (वय ३५) या युवकाचा मृतदेह (dead body) आढळला होता. मृताच्या शरीरावर गंभीर स्वरूपात मारहाण झाल्याच्या खुणा यावेळी होत्या . दरम्यान मृतकाच्या पत्नीने पाथरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर १६ एप्रिल रोजी संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर ठेवत आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार (Funeral) न करण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती तणावपूर्ण होत असतानाच पोलिसांनी २४ तासात आरोपी गजाआड होतील, असे लेखी आश्वासन दिले आणि नंतर अंत्यसंस्कार पार पडले.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला दिली गती
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख विवेक पाटील आणि पाथरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश लांडगे यांनी जलद हालचाली करत तपासाचे चक्र फिरवले. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी राहुल शिंदे व अशोक खंडागळे हे पुण्यात असल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने पुण्यातून दोघांना गुरुवारी पहाटे अटक करून पाथरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांबरोबरच इतर तीन संशयितांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, एकूण आरोपींची संख्या सहा झाली आहे. अद्याप एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, पैशाच्या व्यवहारातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली असून, पुढील तपासात अधिक बाबी उघड होणार आहेत. या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एकीकडे मृतकाच्या कुटुंबीयांना न्यायाची आशा निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.