परभणी(Parbhani) :- पोलीस अधिकारी व अंमलदार यांना संलग्न न करण्या बाबत अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी पत्र काढत सर्व पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सूचना दिल्या आहेत. पोलीस दलात संलग्नच्या (Attached) नावाखाली वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणार्या पोलीस अधिकार्यांना चाप बसणार आहे.
कर्मचार्यांना विहित मुदतीत बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करणे आवश्यक
पोलीस अधिकारी व अंमलदार यांची सार्वत्रिक बदली प्रक्रिया व अपवादात्मक परिस्थितीत प्रशासकीय निकड समजून घटकस्तरावरील व परिक्षेत्रीय स्तरावरील बदली झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना विहित मुदतीत बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करणे आवश्यक असते. मात्र घटक प्रमुख तसेच वरिष्ठ पर्यवेक्षिय अधिकारी विविध कारणांनी त्यांच्या घटकातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांना त्यांच्या बदली ठिकाणाहून इतर ठिकाणी संलग्न करतात. पोलीस अधिकारी व अंमलदार यांना इतर ठिकाणी संलग्न करण्याबाबतची कोणतीही कायदेशीर व प्रशासकीय तरतूद नसल्याने यापुढे सदर अधिकार्यांना व अंमलदारांना संलग्न करण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. घटकातील संलग्न असलेले अधिकारी, अंमलदार (executive) यांचा आढावा घेऊन त्यांना त्वरीत मुळ बदली ठिकाणी हजर होण्याचे निर्देश द्यावेत तसेच पुर्तता पाच दिवसात करावी, अशा सूचना अप्पर पोलीस महासंचालक यांनी दिल्या आहेत.
संलग्नच्या नावाखाली पोलीस एकाच ठिकाणी ठाण मांडून
पोलीस दलातील अंमलदार आणि कर्मचार्यांची दरवर्षांनी बदली होते. पोलीस अधिकार्यांची दोन वर्षाला तर अंमलदारांची पाच वर्षाला बदली करण्यात येते. काही पोलिसांनी संलग्नच्या नावाखाली आपले बस्तान एकाच ठिकाणी बसविले आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयातील विविध तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी कर्मचारी वर्षानुवर्ष ठाण मांडून आहेत. या कर्मचार्यांची बदली झाली तरी सदरचे कर्मचारी वरिष्ठांच्या मर्जीतील असल्याने संलग्नचे आदेश काढून पुन्हा त्याच ठिकाणी सेवा बजावत असल्याचे नजरेस पडत आहेत. अशा कर्मचार्यांना आता चाप बसणार आहे.