परभणी (Parbhani):- येथील रेल्वे स्थानक परिसरात प्लॅटफॉर्म (Platform)क्रमांक एक आणि तीनवर व्यसनाधीन व्यक्तींनी आपला अड्डा केला आहे. या व्यसनाधीन व्यक्तींना सीसीटिव्ही कॅमेरे, पोलिसांची भिती राहिली नसल्याचे दिसत आहे.
रेल्वे स्थानकामध्ये व्हाईटनर सारख्या पदार्थांचा नशा
रेल्वे स्थानक (Railway station)परिसरात भिक मागुन खाणारे, बेघर युवक, वृध्द व्यक्ती, महिला, अल्पवयीन मुले रात्रीच्या वेळी आपला मुक्काम करतात. यातील काहीजण व्यसनी आहेत. रेल्वे स्थानकामध्ये व्हाईटनर सारख्या पदार्थांचा नशा केला जात आहे. या व्यसनाधीन व्यक्तींमुळे स्थानकात येणार्या इतर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यसन घेतल्यानंतर सदर व्यक्ती बिनधास्तपणे रेल्वे स्थानकातच झोपत असल्याचे दिसत आहे.
ना कॅमेरे ना पोलिसांची भिती
परभणी स्टेशनमधील आरपीएफ व जीआरपी अशा चौकीतील कर्मचार्यांची दिवसभरात महत्वाच्या रेल्वेला सेवा असते. मात्र नंदीग्राम ते राज्यराणी या रेल्वे दरम्यान कर्मचारी रेल्वे स्थानकात दिसतात. त्यानंतर मात्र ते दिसून येत नाहीत. पोलीस नसल्याने व्यसन करणार्यांचे मनोबल वाढत आहे. रेल्वे स्टेशन परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. व्यसनाधिन व्यक्तींना कॅमेरे तसेच स्टेशन परिसरातील पोलिसांची भिती राहिली नसल्याचे दिसत आहे. व्यसन करणारे व्यक्ती स्थानक परिसरात बिनधास्तपणे नशिले पदार्थ पित आहेत. याकडे लक्ष देवून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.