पाथरी (Parbhani):- विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी महायुती सरकारने काम केले आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार असल्याने आगामी निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करा. सईद खान व त्यांचे सहकारी विकासासाठी झटत असल्याने आम्ही त्यांच्या पाठीशी राहत पाथरीवर एवढे प्रेम करतो. काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी तुम्हीही उभे रहा असे आवाहन खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. ते मंगळवारी रात्री पाथरी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते .
पाथरीत शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा
शिवसेनेच्या (shivsena) वतीने आयोजित जनसंवाद दौरा मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी पाथरी येथे आला असता शहरातील अंजली मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजता आयोजित पाथरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ता मेळावा नियोजित वेळेच्या पावणे दोन तास उशिरा सुरू झाला. यावेळी मंचावर शिवसेनेना नेते अर्जुन खोतकर , संजय निरुपम ,मा.आ.माणिकराव आंबेगावकर ,शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान , सचिव आसेफ खान ,भाऊ चौधरी ,अनिल जगताप,शिवसेना जिल्हाप्रमुख नाना टाकळकर , युवा जिल्हाप्रमुख अमोल भाले पाटील ,उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे ,माजी नगराध्यक्ष मुंजाजी भाले पाटील ,शिवसेना नेते चक्रधर उगले ,पाथरी विधानसभा प्रमुख पप्पू घांडगे , माजी उपनगराध्यक्ष इसुफोद्दीन अन्सारी , शिवसेना पाथरी विधानसभा मागासवर्गीय विभाग प्रमुख एल.आर .कदम आदींची उपस्थिती होती . प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी केले .
सईद खान यांनी केलेल्या कामांचे केले कौतुक
पुढे बोलताना खा .श्रीकांत शिंदे म्हणाले की , लोक प्रतिनिधी नसताना सईद खान यांनी केलेले काम चांगले आहे .सईद खान यांनी वारंवार मुख्यमंत्र्यांकडे विकासासाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांनी ही त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या असल्याचे ते म्हणाले खान यांच्या प्रयत्नातून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातुन साईबाबा मंदिर (Saibaba Temple)विकासासाठी ९१ कोटी ८० लाखांचा निधी , शहराच्या विकासासाठी २५ कोटी , मुख्यमंत्री सहायता निधी मधून १५ कोटींची मदत व रोजगार मेळाव्यातून ५ हजार २०० लोकांना रोजगार दिला असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला .
खा. डॉ. श्रीकांत शिंदे परभणी येथे आयोजीत शिवसेना कार्यकर्ता मेळावा घेतल्यानंतर पाथरी येथे सायंकाळी सहा वाजता येणार होते परंतु खराब हवामानामुळे त्यांना घेऊन येणारे हेलिकॉप्टर (helicopter) बीड येथे उतरवण्यात आल्यानंतर ते वाहनांच्या ताफ्यात आधी पाथरी येथे आले. २५ मिनिटांत या ठिकाणची सभा आटोपून त्यांनी परभणीकडे प्रस्थान केले. दरम्यान नियोजित वेळेच्या पावणे दोन तासाने सभा सुरू होऊनही या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला व शिवसैनिकांची उपस्थिती होती .