पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळेपर्यंत बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय
परभणी (Parbhani Violence) : बुधवार ११ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या परभणी बंदमध्ये शहरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली. या घटनेचा निषेध करत जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही, तो पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने घेतला आहे. गुरुवार १२ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजीत बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.
मंगळवार १० डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेचा व्यापार्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. ११ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या (Parbhani Violence) बंदमध्ये शहरातील बाजारपेठही बंद होती. काही समाजकंटकांनी बाजारपेठ फोडण्याचे काम केले. परभणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना अंकुश लावता आले नाही. त्यामुळे संबंधितांची बदली करावी, निलंबन करण्याची मागणीही करण्यात आली. व्यापार्यांच्या दुकानांचे मोठे नुकसानही झाले. पंचनामे करुन शासनाने नुकसान भरपाई देई पर्यंत बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने घेतला आहे. बैठकीला व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत हाके, कार्याध्यक्ष नितीन वट्टमवार, अशोक मंत्री, संजय मंत्री, बाळकृष्ण गडम आदींनी मार्गदर्शन केले. तसेच बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले.
शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
बंद दरम्यान दुकानांचे मोठे नुकसान करण्यात आले. तसेच विद्युत मिटरचीही तोडफोड करण्यात आली. (Parbhani Violence) परभणीतील व्यापार्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. नुकसानीचे पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी, विद्युत मिटर बसवावेत आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी व्यापार्यांसह आनंद भरोसे, भाजपा महानगर अध्यक्ष राजेश देशमुख, सुनील देशमुख, सुरेश भुमरे, डॉ. केदार खटींग यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, पोनि. अशोक घोरबांड यांनी व्यापार्यांचे म्हणणे ऐकूण घेतले.