परभणी/पूर्णा (Parbhani/Purna) :- उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी नांदेड विभागातून संभाजीनगर, कल्याण मार्गे पनवेल समर स्पेशल एक्स्प्रेस (Summer Special Express) गाडीच्या ४० फे-या चालवण्याची घोषणा नुकतीच केली होती. परंतु’ कुठे काय माशी शिंकली माहीत नाही’ आठ दिवसांतच रेल्वे प्रशासनाला आपली घोषणा मागे घ्यावी लागली. प्रशासनाने घोषीत केलेल्या गाडीच्या फे-या रद्द करत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
मागील काही दिवसांपुर्वी नांदेड रेल्वे विभागाने मोठा गाजावाजा करून दि .२९ एप्रिल ते २७ जुन दरम्यान पूर्णा, परभणी, संभाजीनगर, मनमाड, कल्याण मार्गे पनवेल पर्यंत समर स्पेशल पनवेल एक्स्प्रेसच्या ४० फे-या चालवणार असल्याचे दि.१८ एप्रिल रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने सदरील गाडीला प्रवाशांचा मिळत असलेला अल्प प्रतिसाद पाहून दि.३० एप्रिल पासून पुढील आदेशा पर्यंत ह्या गाडीच्या सर्वच्या सर्व फे-या रद्द करण्यात आले असल्याचे कळवले आहे.
नांदेड (Nanded) येथून पनवेल(Panvel), मुंबई(Mumbai), कडे धावणा-या गाड्यांच्या आरक्षणाचा तक्ता फुल्ल असल्याने प्रवाशी पर्यायी व्यवस्था म्हणून खाजगी बसने प्रवास करत आहेत. खाजगी प्रवासी वाहतूकदार अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहेत असे असताना मात्र रेल्वे प्रशासनाकडून घोषीत केलेल्या समर स्पेशल गाडीच्या फे-या रद्द करत असल्याने प्रवाशांतुन उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत आहे. प्रशासनाने सदरील गाडीची वेळ व पुणे (Pune) मार्गे या गाडीच्या फे-या चालवल्या तर निश्चितच या गाडीला प्रवाशांकडून जोरदार प्रतिसाद मिळेल अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.