वेगवेगळ्या पक्षांतून आले निवडून
बाभळगाव व एरंडेश्वर सर्कलचे सदस्य
परभणी/पाथरी (Parbhani Zilla Parishad Elections) : परभणी जिल्हा परिषद निवडणुकीतून एक लक्षवेधी चित्र समोर आले असून वेगवेगळ्या सर्कलमधून निवडून आलेले आजी व नातू आगामी काळात जिल्हा परिषद सभागृहात एकत्रितपणे दिसणार आहेत. जिल्हा परिषद कामकाजात हे चित्र प्रथमच अनुभवायला मिळणार असून निवडणूक प्रक्रियेतून घडून आलेल्या या योगाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
पाथरी तालुक्यातील बाभळगाव (Parbhani Zilla Parishad Elections) जिल्हा परिषद सर्कल मधून वैजयंताबाई अण्णासाहेब रणेर या निवडून आल्या आहेत. दरम्यान त्यांच्या मुलीचा लेक (नातू) परभणीतील पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर जिल्हा परिषद सर्कल मधून रितेश रावसाहेब काळे हे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. योगायोगाने दोघेही जिल्हा परिषद सभागृहात पहिल्यांदाच प्रवेश करणार आहेत.
आगामी काळात आजी व भाचे हे दोघेही सभागृहात आपापल्या सर्कलमधील प्रश्नांना वाचा फोडत त्या सर्कलच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे चित्र आहे. यामध्ये वैजंयताबाई रणेर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून, तर रितेश काळे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडून आले आहेत.




