शिक्षणाधिकार्यांनी काढले आदेश; गुन्हा दाखल नाही
परभणी (Parbhani Zilla Parishad) : येथील जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात लिपीक रामदास पवार यास कामावर घेतल्यानंतर सोमवारी त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी माध्यमिक शिक्षण विभागात जावून कार्यालयाची झडती घेतली. त्यामुळे एकाच दिवसात रामदास पवार यास परत आपल्या शाळेवर (Zilla Parishad) जावून काम करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी काढले.
रामदास पवार हा पूर्णा तालुक्यातील कळगाव येथील सिध्देश्वर विद्यालयात कार्यरत आहे. परंतू पवार यांचा सेवेचा कार्यकाळ हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात जास्त प्रमाणात गेला आहे. अनेक शिक्षणाधिकारी येवून गेले असले तरी रामदास पवार हा माध्यमिक शिक्षण विभागातच काम करत राहीला. याचे गुढ आजपर्यंत चर्चेतच राहीले. त्यांच्या कार्यात काहीतरी जादू असल्याने शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी त्यांना पुन्हा माध्यमिक शिक्षण विभागात काम करण्यास बोलावले. १० ऑक्टोबर रोजी ते कामास रुजू झाले होते असे समजते.
परंतू त्यांच्या विरोधात अलका सोळंके यांनी तक्रार करुन सीईओ नतीशा माथुर यांचे लक्षात ही बाब आणून दिली. सीईओ यांनी मा. शिक्षण विभागाला अचानक भेट घेवून झडती घेतली. त्यावेळी अनावश्यक व्यक्तींचा वावर कार्यालयात होत असल्याची बाब देखील त्यांच्या निदर्शनास आली. अनावश्यक लोकांवर गुन्हा दाखल करा असे तोंडी आदेश दिल्याचीही चर्चा आहे. सीईओ यांच्या अचानक झडतीनंतर रामदास पवार यांची तात्काळ त्यांच्या शाळेवर जावून काम करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिले. सीईओ यांच्या कार्यप्रणालीबद्दल शिक्षण विभागात व शिक्षकांमध्ये चांगली चर्चा होत आहे.