परभणीच्या जिंतूर पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील घेवंडा शिवारात कारवाई केली…!
परभणी/जिंतूर (Parbhani) : सहाय्यक पोलीस अधीक्षक (Assistant Superintendent of Police) जीवन बेनिवाल यांच्या मार्गदर्शनात जिंतूर पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील घेवंडा शिवारात कारवाई केली. या ठिकाणी एका पत्र्याच्या गोदाममध्ये 300 क्विंटल तांदूळ साठवून ठेवला होता. काळ्या बाजारात विक्रीसाठी साठविण्यात आले होते. मंगळवार 7 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी कारवाई करत धान्याचा साठा जप्त केला. महसूल पथकाला पाचारण करण्यात आले. तहसिलदारांनी गोदामाला सील ठोकले. शासकीय धान्याला काळ्या बाजारात मागणी आहे. धान्य माफियांकडून कमी किंमतीत धान्य खरेदी करत त्याची चढ्या दराने विक्री केली जात आहे.
चालकाने घेवंडा रस्त्याने ट्रक पळविला!
मंगळवार 7 जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या मार्गदर्शनात फौजदार देशपांडे, जमादार गणपत मुरकुटे, दुधाटे, धोत्रे, कांबळे यांचे पथक येलदरी रस्त्यावर गस्त घालत होते. त्यांच्या समोरुन भरधाव वेगात ट्रक गेला. संशय आल्याने पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने न थांबता घेवंडा रस्त्याने ट्रक पळविला. पोलिसांनी पाठलाग केला. मात्र वाहन मिळून आले नाही. याच रस्त्यावर पोलिसांना एका शेतात पत्र्याचे गोडाऊन दिसले. या ठिकाणी चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना धान्याचे रिकामे पोते आढळून आले. या बाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना माहिती देण्यात आली. महसुललाही कळविण्यात आले. तहसिलदार राजेश सरवदे हे घटनास्थळी आले. गोदामात तांदळाचे पोते मिळाले. गोदामाला सील ठोकण्यात आले आहे. काही धान्य तपासासाठी प्रयोगशाळेला पाठविले आहे