अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
परभणी (Parbhani) : शहरातील धनलक्ष्मी नगरात भरदिवसा घरफोडी (Burglary) करत चोरट्यांनी 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना 7 जानेवारी रोजी सकाळी सव्वा अकरा ते दुपारी दिड या दरम्यान घडली. अज्ञात चोरट्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात (Nanalpet Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक सुर्यवंशी यांनी तक्रार (Complaint) दिली आहे. फिर्यादी परिवारासह धनलक्ष्मी नगर येथे राहतात. 7 जानेवारीला सकाळी फिर्यादी नोकरीसाठी शाळेवर गेले. त्यांच्या पत्नी कामासाठी रुग्णालयात गेल्या. तर मुले घराबाहेर गेली होती. दुपारी दिडच्या सुमारास फिर्यादीच्या पत्नीने फोन करुन घरात चोरी (Theft) झाल्याची माहिती दिली. घरी कामासाठी आलेल्या महिलेला त्यांच्या घराचे दार उघडे दिसले तसेच साहित्य अस्ताव्यस्थ टाकलेले होते. याची माहिती महिलेने फिर्यादीच्या पत्नीला दिली. त्यानंतर फिर्यादी हे घरी आले असता त्यांनी घराची पाहणी केली. यावेळी त्यांना सोन्याच्या अंगठ्या, कानातील बाळी, असे 70 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. अज्ञात चोरट्यावर नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.