परभणीतील आंबेडकरी चळवळीचा ठाण्यावाघ हरपला
लोकनेते विजय वाकोडे यांचे निधन; साश्रु नयनाने अखेरचा निरोप
हजारोच्या संख्येने मराठवाड्यातून अंत्ययात्रेत वाकोडे प्रेमी परभणीत
परभणी (Leader Vijay Wakode) : जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात दलित चळवळीचे प्रमुख नेते तथा रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष पँथर विजय वाकोडे Vijay Wakode) यांचे सोमवार १६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास र्हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मंगळवार दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान परभणी शहरातील राहुल नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराच्या मैदानावर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते दिवसभर अंत्यदर्शनासाठी चळवळीत कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.
परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख नेतृत्व असलेल्या विजय वाकोडे (Vijay Wakode) यांनी गेल्या ४० वर्षापासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय राहिले. दलित, मुस्लीमासह सर्व समाजाच्या विविध प्रश्नांवर आक्रमक आंदोलने केली. सुरुवातीला दलित पँथरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या चळवळीच्या कामाला सुरूवात केली होती.
मराठवाडा विद्यापिठाच्या नामांतरण लढ्यातील लाँगमार्च पासून ते सध्या सुरू असलेल्या परभणीतील संविधान प्रतिकृतीच्या विटंबना घटनेनंतर झालेल्या आंदोलनात सक्रीय सहभागी होते. शेवटच्या श्वासापर्यंत आंदोलनात राहिले. त्यांच्या या निधनाने परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. मंगळवार १७ डिसेंबर रोजी आज सायंकाळी त्यांची अंतिम यात्रा परभणी शहरातील राहुल नगर येथून काढण्यात आली. अंत्ययात्रा गौतम नगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शिवाजी चौक, नानलपेठ कॉर्नर, शनिवार बाजार, अपना कॉर्नर मार्गे खंडोबा बाजार येथील स्मशानभुमीकडे निघाली. स्मशानभुमीत हजारोंच्या उपस्थिती साश्रुनयनाने लोकनेते विजय वाकोडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.