परभणीत फौजदारासह महिला जमादार निलंबित!
परभणी (Parbhani) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अवैध दारू विक्रीसाठी (Illegal Sale of Alcohol) नेत असलेले, वाहन पकडून त्याविरुद्ध गुन्हा दाखल न करताच स्वतःचा आर्थिक फायदा करून घेऊन वाहन सोडून देणाऱ्या फौजदार चंद्रशेखर देशपांडे व महिला जमादार लीला जोगदंड यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित (District Superintendent of Police suspended) केले आहे. निलंबन काळात त्यांना मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश ही बजावण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, दि 31 मार्च 2025 रोजी रात्री च्या सुमारास एका वाहनात अवैध दारू नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
दोघांच्या निलंबनामुळे पोलीस खात्यात खळबळ!
त्या माहितीवरून फौजदार चंद्रशेखर देशपांडे, महिला जमादार लीला जोगदंड हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले असता, त्यांना वाहन क्रमांक एम एच 02 बी जे 4509 मध्ये निशांत जैस्वाल हा अवैध दारू नेत असल्याचे दिसून आले. ह्या वेळी फौजदार देशपांडे व लीला जोगदंड ह्यांनी पोलिस कर्मचारी (Police Personnel) नामदेव धोत्रे व बाळकृष्ण कांबळे यांना निशांत जैस्वाल हा दारू पिलेला आहे की, नाही हे चेक करण्यासाठी पोलिस स्थानकातून (Police Station) मशीन घेऊन येण्यास सांगितले. दोघे पोलीस कर्मचारी पोलिस स्थानकात आल्यानंतर, त्यांनी परस्पर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी निशांत जैस्वाल याच्याशी हातमिळवणी करत दारूने भरलेले वाहन सोडून दिले. ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षकांना समजल्यानंतर, त्यांनी चौकशी करून अहवाल पाठवण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांना सांगितले असता, त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर केला त्यावरून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी फौजदार देशपांडे व महिला जमादार लीला जोगदंड यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 25 व मुंबई पोलीस (Sentencing and Appeals) नियम 1956 नियम क्रमांक 3 अनव्ये निलंबित केले आहे. दोघांच्या निलंबनामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली असून, महिला जमादार लीला जोगदंडच्या निलंबनामुळे जिंतूर करांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.