गंगाखेड(Parbhani):- विधानसभा मतदार संघात निवडणूक रिंगणात रासपाचे विद्यमान आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्याबरोबर महाविकास आघाडीचे विशाल कदम, वंचित बहुजन आघाडीचे माजी आ. सिताराम घनदाट यांच्यासह बारा उमेदवार उतरल्याने या मतदार संघातील लढती रंगतदार होणार आहे. निवडणुकीत (Elections)कोण बाजी मारणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
आ. रत्नाकर गुट्टे, विशाल कदम, माजी आ. घनदाट यांच्यात लढत
लक्ष्मीपुत्रांचा मतदार संघ म्हणून राज्यभर चर्चेत असलेल्या गंगाखेड विधानसभेच्या निवडणूक रिंगणात महायुतीने पुरस्कृत केलेले रासपाचे विद्यमान आ. रत्नाकर माणिकराव गुट्टे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने शिवसेना ऊ. बा. ठा. गटाचे विशाल विजयकुमार कदम यांना उमेदवारी दिल्याने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) शरदचंद्र पार्टीकडून निवडणूक लढविण्या साठी इच्छुक असलेल्या माजी आ. सिताराम घनदाट मामा यांनी महाविकास आघाडीत बंडखोरी करून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करीत प्रकाश आंबेडकर यांच्याकडून उमेदवारी मिळवत महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोरच आव्हान उभे केले आहे. विठ्ठलराव रबदडे यांनी जनहित लोकशाही पार्टीकडून उमेदवारी दाखल केली आहे. तर मनसेकडून रुपेश मनोहर देशमुख, राष्ट्रीय मराठा पार्टीकडून माधव सोपान शिंदे यांनी तर अपक्ष उमेदवार म्हणून अलका विठ्ठल साखरे, नामदेव रामचंद्र गायकवाड, विठ्ठल सोपान निरस, विशाल बालाजीराव कदम, संजीव देवराम प्रधान व विष्णू शिवाजी भोसले आदी बारा उमेदवारांनी गंगाखेड विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या मतदार संघात रंगतदार लढती होणार असल्याचे बोलल्या जात असून या निवडणुकीत बाजी कोण मारणार ? असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार लोकसभा निवडणुकीप्रमाणे(Lok Sabha Elections) विधानसभा निवडणुकीत ही मशाल चिन्हावर मते वळविण्यात यशस्वी होणार का ? की माजी आ. सिताराम घनदाट मामा हे महाविकास आघाडीची मते फोडणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी २० नोव्हेंबर नंतर मिळतील असे राजकीय वर्तुळातील जाणकारातून बोलल्या जात आहे.




