परभणीच्या कळगाव येथील ग्राम रक्षक दलातील युवकांचा सत्कार!
ताडकळस (Parbhani ) : येथून जवळच असलेल्या कळगाव (Kalgaon) येथे एका महिलेवर पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला करून जखमी केले होते. या घटनेत गावातीलच ग्राम रक्षक दलातील दोन युवकांनी समय सुचकता दाखवत त्या पिसाळलेल्या कोल्ह्याला हुसकावून लावून महिलेचे प्राण वाचवले होते. या घटनेची दखल घेऊन ताडकळस पोलीस ठाण्याच्या वतीने दोन्ही युवकांचा सत्कार करण्यात आला.
ताडकळस येथून 5 कि.मी.अंतरावर असलेल्या कळगाव येथील कोंडूबाई केरबाजी वाव्हळे या महिलेस 28 डिसेंबर रोजी पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला करून चावा घेतला होता. या कोल्ह्याने महिलेच्या अंगावर गावात येऊन हल्ला केला होता. हल्ला होताच ही महिला जीव वाचवण्यासाठी आरडा ओरडा करीत होती. याच वेळी गावातील ग्राम रक्षक दलातून व्यंकटी सुर्यवंशी व किशन गबाळे या दोन तरूणांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या पिसाळलेल्या कोल्ह्याचा प्रतिकार करत त्या महिलेचा जीव वाचविला. या घटनेत ही महिला गंभीररित्या जखमी झाली होती. या दोन तरूणांमुळे या महिलेचा जीव वाचवून त्या ठिकाणचे वातावरण शांत केले होते. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते गजानन सुरवसे यांनी सपोनि. गजानन मोरे यांना दिली असता या दोन तरूणांनी आपला जीव धोक्यात घालून महिलेचा जीव वाचविल्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने सत्कार (Greetings) करण्यात आला.
ग्राम रक्षक दलातील युवकांचे कार्य प्रेरणादायी!
ताडकळस पोलीस ठाण्याच्या (Tadkalas Police Station) हद्दीतील कळगाव येथील ग्रामरक्षक दलातील (Village Guard) दोन युवकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून एका महिलेला पिसाळलेल्या कोल्ह्यापासून वाचविले. ही घटना सर्व ग्राम रक्षक दलातील युवकांसाठी प्रेरणादायी असून भविष्यात असे कार्य करण्यासाठी युवकांना (Youth) प्रोत्साहन मिळणार असल्याचे गौरद्गार सपोनि. गजानन मोरे यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केले.