वाहन चोरीच्या घटनांवर येणार आळा
हिंगोली () : रेल्वे स्थानकावर वाहनचालकांसाठी ‘पे अँड पार्किंग’ सुविधा अखेर सुरू झाली आहे. शनिवारी, २१ डिसेंबर रोजी सायंकाळी या सुविधेचे उद्घाटन रेल्वे प्रवाशांच्या हस्ते करण्यात आले.
हिंगोली रेल्वे स्थानकाची स्थापना झाल्यापासून येथे वाहनचालकांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध नव्हती. या सुविधेसाठी अनेक वेळा प्रवासी संघटना व नागरिकांनी (Hingoli railway station) दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडे मागणी केली होती. परिणामी, आता ‘पे अँड पार्किंग’ सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. हिंगोली रेल्वे स्थानकावरून दररोज दोन पॅसेंजर, दोन एक्सप्रेस, तसेच साप्ताहिक आणि द्विसाप्ताहिक अशा अनेक गाड्या धावत असतात. काही महिन्यांपूर्वीच हिंगोलीहून मुंबईसाठी रोज धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. पार्किंग सुविधा नसल्याने प्रवासी वाहन असतानाही घरी ठेवून ऑटोरिक्षाने स्थानक गाठत होते.
विशेषतः मुंबईसाठी सकाळी चार वाजता सुटणार्या जनशताब्दी एक्सप्रेसमुळे प्रवाशांना रात्रीच्या वेळेस स्थानक गाठणे मोठ्या खर्चाचे ठरायचे. ऑटोरिक्षा भाडे २०० ते ३०० रुपये असायचे, जे प्रवाशांच्या तिकीट किंमतीपेक्षा जास्त होते. त्यामुळे वाहन पार्किंग सुविधेसाठी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. विशेष म्हणजे हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशन भव्यदिव्य स्वरूपात असून भविष्यात या मार्गावर आणखी रेल्वे धावणार आहेत. अशा परिस्थितीत रेल्वेसाठी आलेल्या वाहन चालकांना कोणत्याही ठिकाणी वाहने उभी करावी लागत होती. कधी कधी या ठिकाणाहून वाहनही चोरीच्या घटना घडल्या होत्या. आता प्रत्यक्षात रेल्वे स्टेशनवर वाहनतळ सुरू करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांचे वाहने सुरक्षित राहणार आहेत.
हिंगोलीच्या रेल्वे मार्गावरून अनेक रेल्वे धावत असतात. प्रत्येक दिवशी प्रवासी संख्या अधिक असते; परंतु प्रवाशांचे वाहन उभे करण्यासाठी वाहनतळ नसल्याने आता वाहनतळ कार्यान्वित करण्यात आले आहे.
रेल्वे स्टेशनच्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सुविधा उपलब्ध
दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून पार्किंगचा ठेका घेतलेल्या मोहम्मद साबीर यांनी सांगितले की, प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर ही सुविधा उपलब्ध आहे. मोटारसायकलसाठी सहा तासांसाठी १० रुपये, तर २४ तासांसाठी ४० रुपये शुल्क आहे. चारचाकी वाहनांसाठी सहा तासांसाठी २४ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.पार्किंगची व्यवस्था अधिक सुरक्षित करण्यासाठी लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.
त्यामुळे वाहन चोरीचा धोका कमी होणार आहे. यापूर्वी (Hingoli railway station) पार्किंग सुविधा नसल्यामुळे अनेक मोटारसायकली चोरीला गेल्याचे प्रकार घडले होते. पार्किंग सुविधा सुरू झाल्यामुळे आता प्रवाशांना स्वतःच्या वाहनाने स्थानक गाठणे सोपे झाले आहे, विशेषतः वाशिम, वसमत आणि परभणीसारख्या ठिकाणी जाणार्या शासकीय कर्मचारी व अधिकार्यांसाठी ही सुविधा लाभदायक ठरणार आहे.