ट्रॅक्टर – दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
परभणी/पाथरी (Pathari Accident) : परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथे देवदर्शन करुन दुचाकीने गावाकडे निघालेल्या तरुणांचा पाथरी शहरातील पोखर्णी फाटा येथे वळणावर ट्रॅक्टरसोबत अपघात झाला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना शनिवार ७ डिसेंबर रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास घडली.
गणेश पांडुरंग तसनुसे असे मयताचे नाव आहे. तर सचिन विठ्ठल सेलार, ओमकार गणेश काचोळे असे जखमींची नावे आहेत. या बाबत अधिक माहिती अशी कि, विठ्ठल नारायण तसनुसे यांनी पाथरी पोलीसात तक्रार दिली आहे. शनिवारी सकाळी फिर्यादी यांचा पुतण्या गणेश हा माजलगाव येथुन एम.एच.१२ एच.एम २४२६या दुचाकीने आपल्या दोन मित्रांसोबत मानवत तालुक्यातील यशवाडी येथे देवदर्शनासाठी आला होता.
दर्शन झाल्यानंतर दुचाकीने माजलगावकडे येत असतांना पाथरी येथील पोखर्णी फाटा या ठिकाणी ऊस वाहतुक करणारा रीकामा ट्रॅक्टर एम.एच.३८ व्ही.६३७८ सोबत अपघात झाला. या अपघातात गणेश तसनुसे यांचा मृत्यू झाला. तर सचिन सेलार, ओमकार काचोळे हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पाथरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथुन पुढे माजलगाव व त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेण्यात आले. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर पाथरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.