अंधापुरी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय
परभणी/पाथरी (Pathari School Bus) : तालुक्यातील अंधापुरी येथून इतर गावातील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाताना महामंडळाच्या प्रवासी बस गाडीमध्ये उभे राहून प्रवास करावा लागत आहे. मानव विकास ची बस सकाळच्या वेळी सदरील गावापर्यंत जात नसल्याने (Pathari School Bus) विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे.
पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागातून विविध शाळांमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानव विकासच्या फेऱ्या पाथरी आगारातून सोडण्यात येतात .तालुक्यातील गोदावरी किनारी भागांमध्ये असणाऱ्या अंधापुरी गावामधून ३ किमी अंतरावर असणार्या उमरा येथील शैक्षणिक संस्थेमध्ये 25 विद्यार्थी तर ८ किमी अंतरावरील गुंज येथीलल शाळेमध्ये ७ विद्यार्थी नियमित येजा करतात.
सकाळी शाळेत जाताना उभे राहून करावा लागतो प्रवास
सकाळी शाळेत जाताना या विद्यार्थ्यांना मानव विकास ची फेरी घेण्यासाठी येत नसल्याने नियमित येणाऱ्या पाथरी आगाराच्या प्रवासी बस (Pathari School Bus) मधून प्रवास करावा लागतो. यावेळी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी हक्काची जागा मिळत नसल्याने गर्दीत उभे राहत शाळेपर्यंत प्रवास करावा लागतो .यात विद्यार्थिनींची मोठी कुचंबना होते.
यासंदर्भात पालकांनी गटशिक्षण अधिकारी यांना तक्रार केल्यानंतर 9 ऑगस्ट रोजी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून पाथरी आगारप्रमुखांना सकाळच्या वेळेत मानव विकासची फेरी सोडण्यासंदर्भात पत्रव्यवहार झाला असला तरी ही बस सुरू करण्यासाठी कोणतीही कारवाई झालेली नाही. स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार सकाळी गौंडगाव पर्यंत येणारी मानव विकास ची फेरी अंधापुरी पर्यंत आल्यानंतर विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. सायंकाळच्या वेळी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी मानव विकास ची बस अंधापुरी गावापर्यंत ज्याप्रमाणे येते त्याचप्रमाणे सकाळच्या वेळी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी मानव विकास ची फेरी सोडावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.