– १३ विरुद्ध ५ मतांनी ठराव मंजूर
– सईद खान यांच्या गटात फूट
– पाच संचालक पुन्हा सहलीवर
परभणी/पाथरी (Pathri Market Committee) : परभणीतील पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मंगळवार ११ नोव्हेंबर अखेर १३ विरुद्ध ५ मतांनी मंजूर झाला. परभणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था येथील सहाय्यक निबंधक (प्रशासन) एम. ए. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकूण १८ संचालक उपस्थित होते.
यावेळी १३ संचालकांनी ठरावाच्या बाजूने मतदान करत नखाते यांच्यावर अविश्वास दर्शवला, तर फक्त पाच संचालक ज्यामध्ये मीनाताई कोल्हे, रोहिणीताई काळे, पी. आर. शिंदे आणि अशोकराव गिराम यांनी सभापतींच्या बाजूने मत दिले. त्यामुळे ठराव तेराविरुद्ध पाच मतांनी मंजूर झाला असून, विद्यमान सभापती नखाते यांची गादी आता गेली आहे.
राजकीय भूकंपाचा धक्का!
या घडामोडींना ३१ ऑक्टोबरपासूनच रंग चढला होता, जेव्हा परभणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सभापती नखाते यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. या ठरावावर १२ संचालकांच्या स्वाक्षऱ्या होत्या, तर तेराव्या संचालकाने राजस्थानहून दूर असतानाही पाठिंबा दर्शविला होता. ठराव दाखल करताना माजी आमदार आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी स्वतः उपस्थित होते. त्यांच्या रणनीतीनुसारच ही संपूर्ण राजकीय चाल रचली गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, शिवसेनेचे अल्पसंख्याक नेते सईद खान यांच्या गटातील सहा संचालकांनी खान यांना विश्वासात न घेता, काँग्रेसच्या दुर्राणी गटाशी हातमिळवणी करत ठराव दाखल केला होता. त्यामुळे सईद खान यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का बसला असून, तालुक्यात शिवसेनेत दोन गट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एक गट जिल्हा प्रमुख नाना टाकळकर आणि बाजार समितीचे संभाव्य सभापती एकनाथ (पप्पू) घांडगे यांच्या नेतृत्वाखाली, तर दुसरा गट सईद खान यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.
दुर्राणींची राजकीय चाल चेकमेट!
दुर्राणी यांनी विरोधी शिंदे गटातील कार्यकर्त्यांना आपल्या प्रभावक्षेत्रात ओढत अविश्वास ठरावाची भूमिका निश्चित केली. परिणामी, राष्ट्रवादीचे अनिल नखाते यांचा राजकीय पाया कोसळला, तर सईद खान यांची संघटनात्मक पकडही कमकुवत झाली.राजकीय वर्तुळात ही घटना दुर्राणी यांनी सईद खान यांना स्थानिक पातळीवर केलेली मोठी कुरघोडी म्हणून पाहिली जात आहे.
तणावपूर्ण बैठक, पोलिसांचा तगडा बंदोबस्त!
सोशल मीडियावर काही कार्यकर्त्यांनी अविश्वास ठराव बैठकीच्या दिवशी संचालकांना धमकीसदृश पोस्ट केल्याने, पोलिस प्रशासन सतर्क झाले होते. कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून १०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता.उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा बाजार समिती परिसरात तैनात होता. संपूर्ण परिसर छावणीसदृश दिसत होता.
सहलीवरून आलेले संचालक आणि पुन्हा प्रवासाला!
ठराव सादर झाल्यानंतर सर्व संचालक सहलीवर रवाना झाल्याची चर्चा होती. मात्र, मंगळवारी झालेल्या मतदानासाठी हेच संचालक माजी आमदार दुर्राणी यांच्या सोबत सकाळी माजलगावच्या दिशेने असलेल्या प्रवेशद्वारातून समितीकडे आले आणि मतदानानंतर त्याच मार्गे परत गेले. दरम्यान, सभापती पदाच्या नव्या निवडीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून 13 पैकी पाच संचालक पुन्हा सहलीसाठी रवाना झाले आहेत .




