जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी काढले आदेश
हिंगोली (Water supply tanker) : सेनगाव तालुक्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्याबद्दल काढलेल्या देयकासंदर्भात संशय घेतल्या जात होता. त्यावरून विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाने केलेल्या चौकशी दरम्यान काही जण दोषी आढळून आल्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी आतापर्यंत एका वरिष्ठ सहाय्यकासह एकूण तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
सेनगाव तालुक्यात सन २०१८ ते सन २०१९-२० या कालावधीत उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांमधून टँकरने (Water supply tanker) पाणी पुरवठा करण्यात आला होता. त्यासाठी लातूर येथील एका कंत्राटदाराने टँकरचा पुरवठा केला होता. जून महिन्यात पाऊस सुरु झाल्यानंतर टँकरने पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर सेनगाव पंचायत समितीने टँकरचे देयक दिले. मात्र सदर देयकाबाबत संशय आल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाकडून चौकशी झाली होती. या चौकशीमध्ये सुमारे ३० लाख रुपयांची अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावरून सेनगाव पंचायत समितीच्या लेखा विभागातील कर्मचारी नितीन बंडाळे, अनिल गव्हाणकर यांना निलंबीत करण्यात आले आहे.
त्यानंतर या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीमध्ये सेनगावच्या गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे अहवाल सादर केला होते. या (Water supply tanker) अहवालामध्ये टँकरची दुसऱ्यांदा देयके सादर करणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक रामेश्वर गवळी याच्यावर कर्तव्यात कसूर करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, एकाच कालावधीतील टँकरची देयके दुसऱ्यांदा सादर करण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरून उपमुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सेनगाव पंचायत समितीचा वरिष्ठ सहाय्यक रामेश्वर गवळी यास निलंबीत केले आहे.