हिंगोली(Hingoli):- तालुक्यातील मौजा येथील ऊस टोळीसाठी मुकदम म्हणून काम पाहणार्या मामाचा फोनपे (Phone Pay)पासवर्ड घेवुन त्यांंच्या खात्यातील दोन लाख १९ हजार रुपये काढुन भाच्याने गंडा घातल्याने वसमत शहर पोलीसात भाच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.
फोन पेच्या माध्यतातुन वेळोवेळी पैसे ट्रान्सफर करण्यात आल्याचे दिसुन आले
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील मौजा येथील महेंद्र मुकिंदराव बरडे हे ऊस तोड टोळीसाठी मुकदम म्हणून काम करीत असताना मागील काही वर्षापासुन साखर कारखान्यांना (Sugar Factory) ऊस तोड मजुर पुरवितात. त्यासाठी मजुरांना लागणारी अनामत रक्कम ते स्वतःजवळील देतात. वसमत शहरातील रेल्वे स्टेशन (Railway station) जवळील संजय कैलास कांबळे हा भाचा ऊस तोडीचे काम करीत होता. त्यामुळे प्रत्येक वेळी मजुरांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना रक्कम देता यावी यासाठी महेंद्र बरडे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये फोन पे चा वापर सुरू केला होता. त्यामुळे मजुरांना रक्कम तात्काळ देण्याकरीता सोयीचे ठरत होते. मागील आठ दिवसांपुर्वी महेंद्र बरडे व त्यांचा भाचा संजय कांबळे हे दोघे वसमत येथे राहण्यासाठी आले होते. २० जूनला संजयने मामा महेंद्र यांच्याकडे २ हजार रुपयाची मागणी केली असता महेंद्र यांनी त्याला फोन पे वरून घेण्यास सांगितले. परंतु भाचा संजय ने त्यांच्या विश्वासघात करून फोन पे वरुन सुरूवातीला एक लाख रुपयांची रक्कम त्याच्या बॅक खात्यात ट्रान्सफर करून घेतल्यानंतर संजय घराबाहेर पडला. त्यामुळे महेंद्र बरडे यांना त्याच्यावर काहीसा संशय बळावल्याने बँकेत जावुन पाहणी केली असता त्यांच्या फोन पेच्या माध्यतातुन वेळोवेळी पैसे ट्रान्सफर करण्यात आल्याचे दिसुन आले.
महेंद्र बरडे यांच्या बँक खात्यातील २ लाख १९ हजार रुपये फोन पे द्वारे ट्रान्सफर झाल्याचे दिसुन आल्याने महेंद्र बरडे यांनी वसमत शहर पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून संजय कांबळे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा हा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल महीपाळे, गजानन भोपे हे करीत आहेत.