हिंगोली (PM Indira Gandhi) : देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी (PM Indira Gandhi) यांचा पुतळा मागील अनेक वर्षापूर्वी हिंगोलीत बसविण्यात आला. सुरूवातीला पुतळ्याचे सुशोभिकरण करून संरक्षण कठडे उभारले होते. काही वर्षापूर्वी एका वाहनाने संरक्षण कठड्याला दिलेल्या धडकेने संरक्षण कठडे कोसळले होते. तेव्हापासून या पुतळ्याजवळ संरक्षण कठडे नसल्याने या ठिकाणी सर्रास मोकाट जनावरांचा वावर होत आहे. कधी कधी तर पुतळ्याजवळ कोंडवाड्याचे स्वरूप प्राप्त होऊन या ठिकाणी मोकाट जनावरे ठाण मांडून बसतात.
पुतळ्याच्या संरक्षणाकरीता अनेकांचा कानाडोळा
हिंगोली प्रशासन व राजकीय लोकांचेही या पुतळ्याकडे दुर्लक्ष होत आहे. फक्त जयंती व पुण्यतिथीच्या दिवशीच या पुतळ्याचे पूजन केले जाते. त्यानंतर पुतळ्यालगत असलेल्या दुरवस्थेकडे मात्र कानाडोळा केला जात असल्याने हा पुतळा दुर्लक्षीत झाला आहे.
प्रशासन व राजकीय मंडळींची उदासिनता
स्व. इंदिरा गांधी (PM Indira Gandhi) पुतळ्यालगत महाविकास आघाडीच्या कार्यकाळात सुशोभिकरणाचा आराखडा तयार करण्यात आला होता. कालांतराने राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पुतळा सुशोभिकरणासाठी पुढाकार घेतला होता. त्यांचे मात्र या पुतळ्याकडे दुर्लक्ष झाले. एकीकडे अनेक पुतळ्याच्या परिसराचे सुशोभिकरण होत असताना स्व. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण तर सोडाच; परंतु संरक्षणाच्या दृष्टीने उदासिनता दिसून येत आहे.