जळगाव/ मुंबई (PM Modi) : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार (Kolkata Rape-Murder) आणि खून प्रकरणाला 16 दिवस उलटले आहेत. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी महिलांविरोधातील वाढत्या गुन्ह्यांवर चिंता व्यक्त करत महिलांविरोधातील गुन्ह्यांना ‘अक्षम्य पाप’ म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जळगाव येथील लखपती दीदी (Lakhpati Didi) कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, असे आश्वासन दिले. इतकंच नाही तर महिलांविरोधातील गुन्ह्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी कायदे मजबूत करण्यात येत असल्याचे पीएम मोदींनी सांगितले.
एवढेच नाही तर जे गुन्हेगारांना संरक्षण देण्यात गुंतले आहेत, त्यांनाही सोडले जाऊ नये, असे पीएम मोदी (PM Modi) म्हणाले. यामध्ये सहभागी असलेल्या रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि पोलीस विभागावर कारवाई करावी, असे सांगितले. जाहीर सभेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, सरकार येतच राहते. पण, आपल्याला आपल्या महिलांचे संरक्षण करायचे आहे आणि महिलांवर गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. पीएम मोदी (PM Modi) म्हणाले की, महिलांची सुरक्षा आणि सन्मान राखणे हे समाज आणि सरकारचे कर्तव्य आहे. महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांसाठी आम्ही कायदा अधिक मजबूत आणि कठोर करत आहोत.
पीएम मोदी (PM Modi) म्हणाले की, पूर्वी एफआयआर नोंदवल्या जात नसल्याच्या तक्रारी येत होत्या. आम्ही बीएनएस आणले आणि त्यात अनेक बदल केले. जर एखाद्या महिलेला पोलिस स्टेशनमध्ये जायचे नसेल तर ती ई-एफआयआर दाखल करू शकते. ई-एफआयआरमध्ये कोणीही बदल किंवा छेडछाड करू शकत नाही. लग्नानंतर महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने अशा चिंता दूर करण्यासाठी बीएनएसमध्ये विशेष सुधारणा केल्या आहेत. महिलांवरील गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्रातील जळगाव येथील (Lakhpati Didi) लखपती दीदी रॅलीत बोलताना मोदींनी गेल्या दशकातील महिलांसाठी आपल्या सरकारने केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकला, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. पंतप्रधान म्हणाले की, 2014 पर्यंत महिला बचत गटांना 25,000 कोटी रुपयांहून कमी कर्ज देण्यात आले होते. मात्र गेल्या 10 वर्षांत 9 लाख कोटी रुपयांची मदत देण्यात आली.
पंतप्रधान मोदींनी (PM Modi) या कार्यक्रमात (Lakhpati Didi) लखपती दीदींशी संवाद साधला आणि 4.3 लाख बचत गटांच्या 48 लाख सदस्यांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने 2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी लॉन्च केला. लखपती दीदी योजना ही केवळ महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नसून येणाऱ्या पिढ्यांना सक्षम बनवणारी आहे. यावर त्यांनी भर दिला. मोदी म्हणाले की, महिला प्रत्येक घर आणि कुटुंबाच्या समृद्धीची हमी आहेत. परंतु पूर्वी त्यांच्याकडे समर्थन प्रणाली नव्हती. महिलांना अनेकदा मालमत्ता नसते किंवा त्यांना बँक कर्ज मिळू शकत नाही, ज्यामुळे त्यांना लहान व्यवसाय सुरू करण्यात अडथळे येतात.