परभणी (Parbhani) :- सततच्या रिमझिम पडणार्या पावसामुळे ऊसाच्या शेतात पाणी साचले आहे. पिकाच्या सभोवताली सापेक्ष आद्रता वाढून तापमान (Tempreture)कमी झालेले आहे. अशा परिस्थितीत ऊस पिकामध्ये पोक्का बोईंग रोगाचा प्रादूर्भाव (Prevalence of disease) होत असल्याचे आढळून आले आहे. या रोगाचा प्रादूर्भाव फ्युजॅरिअम मोनिलिफॉरमी (Fusarium moniliformi) या बुरशी मुळे होतो. ही बुरशी ऊसाच्या पोंग्यात वाढते आणि रोगाचा प्रादूर्भाव होतो.
या रोगास कारणीभूत बुरशीचा प्रसार हवेद्वारे होतो.
या रोगास कारणीभूत असलेल्या बुरशीची लागण सुरुवातीला ऊसाच्या शेंड्यातील कोवळ्या पानावर दिसून येते. पोंग्यातील तिसर्या व चौथ्या पानांच्या बेचक्यात पांढरट पिवळसर चट्टे दिसून येतात. रोगाची लागण झालेल्या पानावर सुरकुत्या पडून पाने अकसतात. ऊसाचे (Sugarcane) कांडे आखुड व वेडेवाकडे होतात. अधिक प्रमाणात रोगाचा प्रादूर्भाव वाढल्यास पोंगे मर किंवा शेंडा कुज सुध्दा दिसून येते. शेंडा कुज झालेल्या ऊसातील शेंड्याचा जोम नष्ट झाल्याने ऊसावरील डोळ्यातून पांगशा फुटतात व कालांतराने असे ऊस वाळतात. रोगट ऊसाच्या कांड्या आखुड झाल्याने व पांगशा फुटल्याने ऊसाच्या उत्पन्ना घट येते. या रोगामुळे ऊसाच्या बेटातील रोगग्रस्त फुटव्यांचेच नुकसान होते. तथापि बाधित न झालेल्या ऊसाचे नुकसान होत नाही. ऑगस्ट महिन्यानंतर आद्रता कमी आणि तापमान वाढल्याने या रोगाची तिव्रता हळूहळू कमी होत जाते. असा प्रादूर्भाव दिसताच रोग नियंत्रणाचे उपाय करण्याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ञ डॉ. जी.डि. गडदे, डॅ. ए.टी. दौंडे, डॉ. डि.डि. पटाईत, एम.बी. मांडगे यांनी केले आहे.