परभणी/पालम (Parbhani):- लातूर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पालम तालुक्यातील मौजे सादलापुर येथील रहिवासी बापूराव व्यंकटी धुळगुंडे (वय ३५) यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराने(Heart disease) निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर बुधवार २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सादलापूर ता.पालम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार(Funeral) करण्यात आले.
उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू
त्यांनी १० वर्षे सेवा बजावली आहे. अहमदपूर पोलीस ठाण्यात धुळगुंडे कार्यरत होते. त्यांना बुधवारी सकाळी ६ वाजता हृदयविकाराचा झटका आला. लागलीच त्यांना उपचारासाठी अहमदपूर येथील एका खाजगी दवाखान्यात अॅडमिट करण्यात आले. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवदेहावर अंत्यसंस्कार(Funeral) करतेवेळी परभणी येथील पोलिस दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी अहमदपूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुसनुर, पालमचे पोनि सुरेश थोरात, पोलीस उपनिरीक्षक गणेश सवंडकर, जमादार कल्याण साठे, शिपाई किशोर बनाटे, सपोनी पठाण तसेच लातूर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मित्र मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पोलीस शिपाई धुळगुंडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, तीन बहिणी, असा परिवार आहे.