पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे आदेश!
परभणी (Police Officer Suspended) : एलसीबीला न पाठविता तहसिलमधून (Tehsil) जामीन करण्यासाठी मदत करण्याकरीता दहा हजाराची लाच मागितल्या प्रकरणी पालम येथे परभणी लाचलूचपत विभागाने सापळा रचत कारवाई केली होती. या प्रकरणात प्रभारी अधिकारी यांच्यासह दोन पोलीस अंमलदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी (Superintendent of Police Ravindra Singh Pardeshi) यांनी आदेश काढत सपोनि. सतीश दोनकलवार, पोह. राजेश्वर येसुरकर, पोशि. अशोक केदारे यांना शासकीय सेवेतून निलंबीत केले आहे.
जामिनासाठी मागितली होती लाच!
जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींना मदत करण्यासाठी दहा हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली. याबाबत परभणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Corruption Department) तक्रार देण्यात आली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने सापळा रचत लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. जन सामान्यात पोलिसांची प्रतिमा मलिन करणे, दिलेले कर्तव्य योग्यरित्या न पाळल्या प्रकरणी सपोनि. सतीश दोनकलवार, पोह. राजेश्वर येसुरकर, पोशि. अशोक केदारे यांच्यावर निलंबनाची कारवाई (Suspension Action) करण्यात आली आहे. निलंबनादरम्यान त्यांचे मुख्यालय हे पोलीस मुख्यालय राहणार आहे, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.