भावनाताई नखाते यांच्या बॅनरमुळे पाथरी तालुक्यात राजकीय चर्चा
परभणी/पाथरी (Bhavana Nakhate) : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे (Aditi Tatkare) यांच्या स्वागतासाठी पाथरी शहरांमध्ये उभारलेल्या बॅनरवर भावनाताई नखाते (Bhavana Nakhate) यांच्यासह राकाँचे घडी पक्षचिन्ह दिसल्याने दिवसभर या बॅनरची चर्चा तालुक्यात ऐकण्यास मिळाली. मागील महिन्यामध्ये माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात प्रवेश घेतल्यानंतर दुर्राणी यांचे खंदे समर्थक व विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांच्या राजकीय भूमिकेविषयी सस्पेन्स वाढला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे 27 जुलै रोजी माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षांमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह तालुक्यातील पक्षाचे सर्वच नेते उपस्थित होते. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिलराव नखाते यांचा ही समावेश होता .त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा व जिल्हा नियोजन समितीच्या विद्यमान सदस्य ह्या देखील अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षात आल्या असतील अशी समज तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये होती.
रविवार 11 ऑगस्ट रोजी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे (Aditi Tatkare) या एका कार्यक्रमानिमित्त परभणी येथे आल्या असता या कार्यक्रमाला भावनाताई नखाते यांनी उपस्थिती लावली. तत्पूर्वी शहरांमध्ये नामदार मंत्री अदितीताई तटकरे यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर झळकले हे बॅनर पाहिल्यानंतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयावर, शहरात व ग्रामीण भागामध्ये अनेकांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळाल्या. शहरातील राकाँ भवन येथे तर एका कार्यकर्त्याने हा ‘गोलीगत धोका ‘असल्याचे मत व्यक्त केले. भावनाताईंनी त्यांची राजकिय भूमिका स्पष्ट केली असून तालुक्यासह जिल्ह्यामध्ये भाऊ नावाने परिचित असणारे अनिलराव नखाते (Bhavana Nakhate) यांची भूमिका काय? असा प्रश्न सध्यातरी उपस्थित होत आहे.
यासंदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी अनिलराव नखाते यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करत आपली राजकिय भुमिका काय अशी विचारणा केली असता, अदिती ताईंचा फोन आला होता .कार्यक्रमाला भावना नखाते यांनी उपस्थित राहण्याचे सांगितले होते .त्या माझ्या पाथरीतील निवासस्थानी भेट देणार आहेत. अधिकचे मी प्रत्यक्ष भेटल्यावर सांगतो .असे म्हणत बोलणे टाळले असुन नखाते यांनी पुढील राजकीय भूमिकेविषयी सस्पेन्स कायम ठेवला आहे.