लातूर (Latur) :- डॉ. बाबासाहेबांचे संविधान देशाला लागू करताना आरएसएसने संविधान मनुस्मृतीवर आधारित नाही, असे म्हणत देशाचे संविधान, पंडित नेहरू व महात्मा गांधी (Mahatma Gandhi)यांचे पुतळे दिल्लीतील रामलीला मैदानावर जाळले आणि संविधानाला विरोध केला. ज्या आरएसएसने हे काम केले, त्या आरएसएसचे व भाजपाचे तेच लोक आहेत. गरीबांनो, तुमचे हित संविधानात आहे. संविधान गेल्यास अस्तित्व संपून जाईल, असा इशारा काँग्रेसचे(Congress) अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला.
जातीय जनगणना करून सगळ्यांना त्यांचे हक्क देण्याची भूमिका काँग्रेसची
बुधवारी लातूर येथे महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना खर्गे यांनी काँग्रेसने एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी व इतर जातींना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी जातीय जनगणना करून सगळ्यांना त्यांचे हक्क देण्याची भूमिका काँग्रेसची आहे. देशामध्ये नोकर भरती बंद आहे. आरक्षणातील लोक शासकीय यंत्रणेत नको, म्हणून नोकर भरती बंद केली आहे, असा आरोप करीत आमचे सरकार आल्यास महाराष्ट्रात 2 लाख 50 हजार नोकर भरती तात्काळ केली जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्यामध्ये चोरांचे सरकार आहे. ज्यांनी 50 खोके घेतले, त्यांना घरी बसवा. हीच ती वेळ आहे, हीच ती संधी आहे. या राज्यामध्ये ऑक्टोबरपर्यंत या वर्षात 2336 शेतकऱ्यांनी आत्महत्या (suicide) केल्या. मोदींचे सरकार हे लबाडांचे सरकार आहे. मोदींनी खोटे वायदे केले. आज शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन आले, उत्पादन चांगले झाले; मात्र त्या सोयाबीनला हमीभाव नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सहा हजार हमीभाव देऊ, अशी घोषणा लोकसभा निवडणुकीवेळी केली होती. मात्र आज 3200 रुपये प्रतिक्विंटल सोयाबीन विकले जात आहे.
काळेधन परदेशात ठेवले आहे, असा आरोप काँग्रेसवर केला गेला
कापसाचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी हे सरकार घालवा, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसने देश लुटला असा आरोप मोदींनी 2014 मध्ये केला होता. काळेधन परदेशात ठेवले आहे, असा आरोप काँग्रेसवर केला गेला. हे काळे धन परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकू, असा शब्द मोदींनी दिला होता. मात्र दहा वर्षात मोदींनी (Narendra Modi) कुणाच्याही खात्यात पैसे टाकले नाहीत. एक कोटी चाळीस लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणारे देशाचे पंतप्रधान खोटारडे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे भाषा केली. मात्र उत्पन्न दुप्पट झाले नाही. शिवाय शेतकऱ्यांना बेरोजगारांना महिलांना या सरकारने वाऱ्यावर सोडले. मोदीचे धोरण हे आपले दोन मित्र अदानी आणि अंबानी यांना जगविणे, हेच आहे, अशी टीका त्यांनी केली. मोदी, फडणवीस, शिंदे, अजित पवार हे सगळे लबाड आहेत. लबाडांचे सरकार आहे, हे सरकार घालवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या सभेला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.