परभणीतील पाथरी तालुक्यातील ६५ टक्के शेतकर्यांची माहीती महाआयटी पोर्टलवर अपलोड
उर्वरित माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू
परभणी/पाथरी (Parbhani farmers) : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाचा आदेश निर्गमित होत नुकसान भरपाईची रक्कम वर्ग करण्यात आली होती .पाथरी तालुक्यातील बाधित शेतकर्यांपैकी पैकी ६५ शेतकऱ्यांची माहिती मंगळवार पर्यंत महा आयटी पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून केवायसी केलेल्या शेतकर्यांच्या खात्यावर पुढील आठ दिवसापासून आर्थिक मदत वर्ग होण्याची शक्यता आहे . या संदर्भात प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यासह पाथरी तालुक्यातील (Parbhani farmers) शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यावेळी तालुक्यातील ४७ हजार ७०८ शेतकर्यांचे बागायती, जिरायती व फळबाग असे ४१ हजार ५२१ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले होते. पाहणी व पंचनामे केल्यानंतर शासनाकडून ऑक्टोबर रोजी बाधीत शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधी (एनडीआरफ ) निकषाप्रमाणे मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते.
यावेळी तालुक्यातील बाधीत शेतकऱ्यांना ५८ कोटी ३ लाख ३३ हजार २०० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. प्रशासनाकडून सदरील (Parbhani farmers) शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यासाठी महा आयटी पोर्टलवर माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया चालू असून मंगळवार २६ नोव्हेंबर पर्यंत बाधित ४७ हजार ७०८ शेतकऱ्यांपैकी ३१ हजार ३३५ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करत त्यांना मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत ३७ कोटी ९३ लाख ७८ हजार ५८२ रुपये मदत निधी महा आयटी पोर्टलवर अपलोड करत या रकमेला मान्यता देण्यात आली आहे.
आतापर्यंत पाथरी तालुक्यातील एकूण बाधित शेतकऱ्यांपैकी ६५ टक्के शेतकऱ्यांची माहिती महा आयटी पोर्टलवर अपलोड झाली असून ई – केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील आठ दिवसापासून अतिवृष्टी मदत निधी पडण्याची शक्यता व उर्वरित शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम वेगाने चालू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली आहे.
दरम्यान ४ ऑक्टोबर रोजी मदती संदर्भात आदेश निर्गमित झाल्यानंतर (Parbhani farmers) शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचण्याचे काम सुरू झाले होते. मध्यंतरी विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागल्याने शेतकर्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यास अडचण निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या आचारसंहिता संपली असून पुढील आठ दिवस शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.