प्रहार
– प्रकाश पोहरे
Maharashtra Assembly Election: पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले डॉ. निमिष साने, अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्यांचे पती परकाला प्रभाकरण, प्यारेलालजी गर्ग आणि अनेक आकडे तज्ञ् , अनेक निवडणूक विश्लेषक, तसेच ध्रुव राठी, अशोक वानखडे, निखिल वागळे, राजू परुळेकर, दीपक शर्मा, अजित अंजुम सारखे शेकडो पत्रकार, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, श्याम मानव, पुरषोत्तम गावंडे, अमिताभ पावडे सारखे अनेक सामाजिक जाणीव असलेले समाज सेवक, प्रबोधनकार , असंख्य राजकीय नेते, एवढेच कश्याला अगदी सत्ताधारी पक्ष्याचे अनेक नेते (अर्थात खाजगीत) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या विश्लेषणात म्हणत आहेत की निवडणूकीच्या आकडेवारीत आणि मतदानाच्या टक्केवारीत काहीतरी घोळ नक्कीच आहे.
याच वर्षी मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी महाराष्ट्रात ९.३० कोटी पात्र मतदार होते तर त्या नंतर नोव्हेंबर महिन्यात म्हणजे केवळ ५ महिन्यात विधानसभेच्या मतदानावेळी ९.७० कोटी पात्र मतदार होते, म्हणजे एकूण ४० लाख मतदार वाढले (Maharashtra Assembly Election) व मतदानाचा टक्काही वाढला परिणामी, जवळपास ६९ लाख मत ह्या विधान सभेच्या निवडणूकित वाढली. लोकसभेला एकूण ५.७१ कोटी लोकांनी मतदान केले. विधानसभेच्या वेळी ६.४० कोटीं लोकांनी मतदान केले, म्हणजे ६९ लाख मतदार कसे वाढले? आणि या सगळ्यांनी फक्त भाजप महायुतीलाच कसे काय मतदान केले? हे सगळेच संशयस्पद आहे.
लोकसभेच्या वेळी २.६३ कोटी महिलांनी मतदान केले होते. विधानसभेच्या वेळी ३.०६ कोटी महिलांनी मतदान केले. म्हणजेच वाढलेल्या ६९ लाख मतांमध्ये महिलांचा वाटा ४३ लाख मतांचा आहे. याचे श्रेय केवळ ‘लाडकी बहीण’ योजनेला देणे चुकीचे आहे. आपल्या शेतकरी भावाने, बापाने उत्पादित केलेल्या कुठल्याच शेतमालाला मागील ३ वर्ष्यापासून भाव मिळत नाही, परिणामी घरामध्ये त्याची होणारी तगमग त्यापरिणामी अनेक महिलांनी चिडून बाहेर येऊन महाविकास आघाडीला म्हणजे भाजपा विरोधात मतदान केले ही शक्यता गृहीत धराविच लागेल.
लोकसभेत महाविकास आघाडीला (सांगलीची अपक्ष जागा धरून) जवळपास २.५५ कोटी मतं होती, ती घटून २.२७ कोटी झाली म्हणजे साधारण २९ लाख मतं कमी झाली आहेत, ती का? हे सगळेच संशयस्पद आहे. (Maharashtra Assembly Election) लोकसभेत महायुतीला जवळपास २.४८ कोटी मतं होती. ती आता ३.१७ कोटी आहेत. म्हणजे महायुतीची साधारण ६९ कोटी मतं वाढली आहेत. म्हणजे एकूण मतदान जे वाढले तितकीच, म्हणजे वाढलेली सगळीच्या सगळी मत महायुतीलाच कशी काय पडलीत? हे सगळेच संशयस्पद आहे.
काय शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळून ते खूष झालेत म्हणून की ?
बहिणीला, बायकोला रोजची ५० रुपयाची भीक मिळालीय म्हणून की ?
आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे आपले “साले ” किंवा जावई झालेत त्यामुळे ते आपल्या घरी जेवायला येतील की?
आपल्याला त्यांच्या घरी जेवायला जाता येईल म्हणून की ?
मंत्रालयातील अधिकारी आपल्या शेतावर येऊन आपल्या समस्या समजून घेऊन उपाय योजना करतील म्हणून? या सगळ्यां प्रश्नांची उत्तरे कुणीतरी द्यायलाच हवीत.
लाडकी बहीण (CM Ladki Bahin Yojana) सारख्या योजनांमुळे शहरी मध्यमवर्गीय मतदार वाढले हे तुणतुणं भाजपने वापरल असे एक वेळ गृहीत धरले तरी हि आकडेवारी जुळत नाहीय. लोकसभेच्या वेळी दुरावलेले ओबीसी मतदार आणि हिंदू अनुसूचित जातींमधला मतदार यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपल्याकडे वळवण्यात महायुती यशस्वी झाली का ? ह्याचा शोध घेतला असता ती सुद्धा शक्यता निकाली निघाली आहे.
मोदी किंवा शहा यांच्या सभांना अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या हे या निवडणुकीच्या काळातील फोटो/ व्हिडीओ वरुन आजही स्पष्ट दिसते, याउलट शरद पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी व अमाप उत्साह होता, मग प्रत्यक्ष मतदानात नेमके उलटे का झाले? हा सूज्ञांना प्रश्न पडला आहे !
महाविकास आघाडीत काँग्रेसची २१ लाख आणि शिवसेनेची ३१ लाख मतं कमी झाली आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी (शरद पवार) यांची १३ लाख मतं वाढली आहेत. म्हणजे २१+३१ = ५२ वजा १३ म्हणजे ३९ लाख मते कशी कमी झाली?
याचा शोध महाविकास आघाडीने घेतला पाहिजे. मित्रपक्षांचे लोकसभेत उमेदवार नव्हते. त्यांनाही १० लाख मत पडली आहेत. राष्ट्रवादी(शप) ने लोकसभेपेक्षा विधानसभेत जास्त जागा लढवल्या त्या तुलनेत त्यांची मतं २३-२४ लाखांनी वाढायला हवी होती. ती राज्यातील मतदारांचा महायुतीच्या विरोधातील मूड बघता वाढलेली नाहीत* ? उलट त्यांना १० लाखांचा फटका आहे. शिवसेना (उबाठा) ने लोकसभेपेक्षा कमी जागा लढवल्या. त्या तुलनेत त्यांची २४ लाख मतं कमी होणं समजण्यासारखं होतं. तरी जास्तीची ८-९ लाख मतं कमी झालेली दिसत आहेत.
सेना(उबाठा) आणि राष्ट्रवादी(शप) ची काही मतं मित्रपक्षांकडे वर्ग झालेली असू शकतात. राज्यात काही मतं राष्ट्रवादी(शप) कडून अजितदादांकडे गेलेली असू शकतात. सर्वाधिक पडझड काँग्रेसची आहे. काँग्रेसने लोकसभे इतक्याच जागा लढवल्या आहेत, तरी त्यांची २१ लाख मतं कमी कशी झाली? आणि कुठं गेली आहेत? याचा काँग्रेसने शोध घ्यायला हवा. यात हिंदुत्वापेक्षा चुकलेले तिकीट वाटप, बंडाळी, आपल्या मतदारांना गृहित धरणे आणि नॉट रिचेबल प्रदेशाध्यक्ष या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत का? एका बाजूला भाजपने चालवलेले वोट जिहादचे नॅरेटिव्ह आणि दुसऱ्या बाजूला वंबआ, एमआयएम, अजित दादांनी मुस्लिमांना चुचकारण्यासाठी चालवलेले नॅरेटिव्ह या कात्रीत सापडलेल्या काँग्रेसने मूग गिळून बसणे पसंत केले की काँग्रेस मधे असलेले भाजपचे “स्लीपर सेल” काम करत होते का ? हेही लक्ष्यात घ्यायलाच हवे.
महाविकास आघाडीने लोकसभेतील आपल्याला मिळालेले बहुमत अजून वाढवण्याकरता तसा फारसा प्रयत्न केलेला नाही हे सुद्धा लक्ष्यात घेणे गरजेचे आहे. त्याकरता त्यांची रणनीती काय होती तेच जाणोत. लोकसभेत मोदींना मत दिलेल्या पण विधानसभेत उद्धव ठाकरेंना मत देऊ शकतील अशा शिंदे सेनेतील मतदारांना चुचकारणे गरजेचे होते. त्याकरता उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदाकरता जाहीर करणे गरजेचे होते. त्याने हिंदुत्वाचा जो थोडासा प्रचार भाजप ने चालवला तितकाही चालला नसता.
पलीकडच्या बाजूला मुख्यमंत्री कोण हा पेच निर्माण झाला असता कारण सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते. दुसरी गोष्ट अशी की सर्वसमावेशक विकासाचे एक व्यापक ग्रँड नॅरेटिव्ह देणे अपेक्षित असताना सगळा प्रचार महायुतीविरोधी फिरत राहिला. ते १५०० रुपये देत आहेत तर आम्ही ३००० रुपये देवू हे सांगणे म्हणजे अकलेची दिवाळखोरी होती, त्या पेक्ष्या स्पष्टपणे राज्य दिवाळखोरीत असतांना १५०० रुपये दिल्या पेक्ष्या आम्ही कृषी प्रक्रिया उद्योग उभारून कृषी मालाला भाव देवू आणि रोजगार सुद्धा उपलब्ध करून देवू हे सांगणे गरजेचे होते. लोक टीव्हीवरच्या रोजच्या यांच्या भांडणांना कंटाळले होते आणि त्यांच्यासमोर सकारात्मक अजेंडा, एकत्रितपणे ठेवणे गरजेचे होते. आहे त्यात मश्गूल राहणे आणि महायुतीच्या न्यारेटिव्ह मधे फसणे आणि गाफील राहणे योग्य नव्हतेच.
लोकसभेत महायुतीपेक्षा माविआला ७ लाख मतं जास्त मिळाल्याने संविधान वाचत नाही. ते सातत्याने वाचवावे लागते. भाजपविरोधी एकवटलेला मोठा मतदार आजही मविआच्या बरोबर ठामपणे उभा आहे. केवळ हिंदुत्वाचे मुद्यावर भाजपबरोबर असलेला मतदार मविआकडे यायला तयार आहे, त्यांच्या समस्या तितक्याच तीव्र आहेत. सोयाबीन, कापूस, आलू, कांदा, काजू, धान कश्या कश्याला म्हणून मागील तीन वर्ष्या पासुन भाव नाही, शेतीतील खर्च वाढलेला आहे, अतिवृष्टी मुळे सोयाबीन पीक बरबाद झालेले आहे, पिकविमा मिळालेला नाही.
६८ हजार शाळा बंद करायचे ठरले आहे आणि त्यातील १४ हजार शाळा बंद सुद्धा केल्यात, उरलेल्या ५८ हजार शाळा बंद होउ घातल्या आहेत. आरोग्य सेवांची वाताहत, न झेपणारी महागाई, वाढती बेरोजगारी, राज्यातील सुरु असलेले २० पेक्ष्या ज्यास्त उद्योग गुजरात मधे नेले आणि नवीन येऊ घातलेले डझनभर उद्योग सुद्धा गुजरातला पळविले आहेत. राज्यावरील वाढलेले कर्ज, महागाई, बेरोजगारी, हिंदू विरुद्ध मुसलमान भडकावणे, पैश्याचा खेळ करून फोडलेले पक्ष आणि नासवलेले वातावरण, हे आजही ज्वलंत मुद्दे आहेत आणि त्यावरून रान उठवण्याची आजही संधी आहे. त्याकरता संविधान नुसते हातात घेऊन उपयोग नाही तर संविधान वाचवू शकेल अशी संघटना बांधणे आणि लोकांत जाणे गरजेचे आहे.
नव्याने वाढवलेले ६९ लाख मतदार शोधणे आणि त्यातही ४३ लाख महिलांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यांनी हिंदुत्व की संविधान या मुद्द्यावर मत दिलेले नाही. त्यांनी शेतमालाचा कमी झालेला भाव, भूक आणि वाढलेली महागाई विरुद्ध हातात आलेले दीड हजार रुपये यावर मत दिले आहे ? लाडक्या बहिणींचे आणि हिंदुत्वाला श्रेय देणे भाजपाला सोयीस्कर आहे, मात्र वाचकांनी ती चूक करू नये. अनेक मतदारसंघात पडलेली मते आणि मोजलेली मते यात तफावत आहे. अनेक ठिकाणी मतमोजणी करताना इव्हिएमची बॅटरी ९९ % चार्ज असलेली आढळली आणि त्याच मशीन मध्ये भाजपाला सगळ्यात जास्त मतं मिळालीत, जे हरियाणात सुद्धा झाले, आणि जिथे जिथे डबल इंजिनचे सरकार होते तेथे तेथे हे हमखास झाले.
अनेक ठिकाणी उमेदवाराची स्वतःची आणि त्याच्या कुटुंबीयांची मते सुद्धा त्या मतदारसंघात पडलेली नाहीत. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनचे सील तुटलेले आढळले, मशीन बदलेल्या आढळल्या तर अनेक ठिकाणी मतदारांची नावे गायब होती, तर अनेक ठिकाणी मृतकांची नावे घुसडून मतदान केलेले होते.*.
मतदान कसे वाढू शकते, टक्केवारी कशी वाढू शकते, कसे वाढवून देऊ, त्याकरिता किती पैसे लागतील या संदर्भामध्ये काही चॅनेल्सनी स्टिंग ऑपरेशन केले या संदर्भात निवडणूक आयोग किंवा पोलीस किंवा संबंधित विभाग कुठल्याच तक्रारीची दखल का घेत नाही? मतमोजणीच्या ठिकाणी अनेक लोकांनी तक्रारी करूनही त्याची दखल का घेतल्या गेलेली नाही?
*हे संपूर्ण डिजिटल चे युग असतांना मतदानाचे दिवशी २० तारखेला सायं ५ वाजता ५,कोटी ६४लाख ८८ हजार ०२४ म्हणजे ५८. २२ टक्केवारी होती, तर रात्री ११.३० ला ६कोटी ३०लाख ८५हजार ७३२ म्हणजे ६५.२ टक्केवारी होती ती कशी वाढली? एवढेच नव्हे तर २३ तारखेला मत मोजणीच्या दिवशी अजून ९लाख ९९हजार ३५९ मते वाढलीत म्हणजे एकदर दोन वेळची मिळून ७५ लाख ९७ हजार ०६७ अशी एकंदरीत ७.८६% च्यावर कशी मते कशी वाढली? हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश अश्या ज्या ज्या राज्यात भाजप सरकार सत्तेवर होते तेथे तेथेच टक्केवारी वाढली आणि तेथेच भाजपा एकतर्फी निवडून कशी आली? आणि ज्या राज्यात भाजप सरकार सत्तेत नव्हते तेथे अशी टक्केवारी का वाढली नाही?
या संदर्भात माजी “केंद्रीय चुनाव आयुक्त” कुरेशी ह्यांनी या संदर्भात अनेक शंका व्यक्त केल्या आहेत ज्या लक्ष्यात घ्याव्याच लागतील आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सध्याचे केंद्रीय चुनाव आयुक्त म्हणजे “केचुआ” राजीव कुमार ह्यांना द्यावीच लागतील. (Maharashtra Assembly Election) महाराष्ट्राच्या निकालांमुळे सगळेच अवाक झाले आहेत. काय बोलावं कळेनासं झालं आहे. पराभव जिव्हारी लागावा असाच असल्याने सगळ्यांना आणि विशेषतः ज्यांनी खूप परिश्रम घेतले होते त्यांना जसा धक्का बसला आहे, तसाच तो मलाही बसला आहे. मात्र, परिस्थिती समजून घेऊन कामाला लागले पाहिजे. सामान्य मात्र प्रामाणिक असे लोक आणि ज्यांना, “जीना यहा मरणा यहा इसके सिवा जाणा कहा ” आणि आपण गेल्यावर या देशाचे आणि आपल्या कुटुंबियांचे काय होईल, अशी चिंता ज्यांना असेल अश्या देशप्रेमी लोकांना हे चित्र बदलायचे असेल, तर अगदीच किरकोळ काम करावे लागेल..
आज रविवार १ डिसेंबर आहे, तर येणाऱ्या गुरुवारी म्हणजे ५ डिसेंबरला गजानन महाराजांचे नाव घेऊन दुपारी १ ते ३ वाजता केवळ २ तास दंडावर काळ्या पट्ट्या बांधून, हातात जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजीचे, फोटो किंवा पोस्टर घेऊन किंवा गळ्यात तसे फ्लेक्स घालून आणि आपले हात हातात घेऊन मानवी साखळी तयार करून आपापल्या शहरातील गांधी मैदानावर किंवा गांधी पुतळ्याजवळ किंवा हुतात्मा स्मारका जवळ जमा व्हा, कारण ह्यापैकी काही तरी नक्कीच आपल्या गावात असेल, नसल्यास महत्वाचे सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी ठरवून जमा व्हावे. कुठलीही घोषणा नाही, केवळ शांतता आणि शांतता बाळगून हे करा. तरुणांनी त्याचे मोबाईलवर युट्युब लाईव्ह करावे, आणि ते आपल्या गावाचे नाव घेऊन सोशल मीडियावर लाइव्ह करून व्हायरल करावे. जर पोलीस अटकाव करत असतील तर त्यांच्या सोबत शांतपणे बोला, त्याचेही लाईव शूटिंग करा, आणि व्हायरल करा.
देशाला, जगाला हे समजू द्या की भारतात लोकशाहीचा कसा खून होतोय आणि ती कशी संकटात आहे! पोलिसांनी सुद्धा अतिरेक न करता शांततामय प्रदर्शन करणाऱ्या लोकांना अटकाव करू नये, कारण ते सुद्धा लोकशाही, जीला आम्ही वाचवायला निघालोत तिचे घटक आहेत हे विसरू नये. त्यामुळे त्यांनी केवळ शांतता सुव्यवस्था राखण्याचे काम करावे हि विनंती. काही शक्यता आपण गृहीत धरूयात, एक तर मला त्यापूर्वी अटक करतील, नेहमी करतात तसे शहरात जमावबंदी कलम १४१ लागू करतील, जे माहिती आहेत की हे जागृत लोक आहेत अश्या लोकांना पोलीस नोटीस देतील, त्याला घाबरायचे काही कारण नाही, हे झाले तर समजून जा की सरकार घाबरले आहे आणि त्यांच्या मनात काळे बेरे आहे.
मात्र म्हणून घाबरून घरात बसू नका, कारण हे प्रतिकात्मक आंदोलन आहे. मी अकोल्याच्या गांधी जवाहर बागेसमोर शांतता आंदोलनात आपली वाट पाहत सामील होणार आहे. लोकांना लोकशाही वाचवायची आहे की केवळ घरी कुथत बसायचय? याची हि परीक्षा आहे, सरकार उत्तीर्ण होतय की लोक उत्तीर्ण होतात ते बघूया!
लेखक: प्रकाश पोहरे
संपादक, दैनिक देशोन्नती, दैनिक राष्ट्रप्रकाश, साप्ताहिक कृषकोन्नती
प्रतिक्रिया देण्यासाठी 98225 93921 वर ‘थेट प्रकाश पोहरेंना संपर्क करा किंवा आपल्या प्रतिक्रिया याच व्हॉट्सअप वर पाठवा.’ प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहायला विसरू नका.