हिंगोलीतील रेल्वे उड्डाण पुलावर जागोजागी खड्डे
खड्ड्यामुळे अपघाताला मिळतय निमंत्रण
हिंगोली (Hingoli flyover) : शहरातील रिसाला बाजार भागाकडे जाणार्या रेल्वे उड्डाण पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास पाण्याने भरलेले टँकर जात असताना खड्ड्यात आदळल्याने टायर फुटले. चालकाने सतर्कता दाखविल्याने बालबाल बचावले.
हिंगोली शहरात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. अकोला बायपास भागापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या पर्यंत मोठ्या सिमेंट रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदरील रस्त्याचे काम रिसाला बाजार जिल्हा परिषद शाळेपर्यंत टप्याटप्याने पूर्ण झाले आहे. रिसाला बाजार भागाकडे जाणार्या रेल्वे उड्डाण पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्डयामध्ये वाहन आदळल्यावर अनेक वेळा अपघाताच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे या रेल्वे उड्डाण पुलावर रात्रीच्या सुमारास नेहमीच अंधार असतो.
अशावेळी वाहन चालकांना खड्डे दिसत नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. ६ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास एका ट्रॅक्टरद्वारे पाण्याचे टँकर रिसाला बाजार भागाकडे नेण्यात येत असताना टँकरचे टायर खड्ड्यात अडकल्याने मोठा आवाज होऊन टायर फुटले. सुदैवाने चालकाने ट्रॅक्टरवर नियंत्रण राखल्याने मोठी दुर्घटना टळली. शेवटी ट्रॅक्टर चालकाने टँकरमधील पाणी जवळच असलेल्या झाडाला सोडून दिल्यानंतर फुटलेले टायर काढण्यात आले. त्यामुळे या रस्त्याचे काम होत असले तरी सद्यस्थितीत पडलेले खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविल्यास होणारे अपघात टळू शकतील.