हिंगोली(Hingoli) :- शहरात वारंवार वीज पुरवठा विस्कळीत होत असल्याने भाजपा पदाधिकार्यांनी ३० जुलैला महावितरण कार्यालयात धाव घेवुन त्याचा जाब विचारला. आ. तान्हाजी मुटकुळे यांनी महावितरणच्या अधिकार्यांशी संपर्क साधून सुरळीत वीज पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या.
आ.मुटकुळेंनी भ्रमणध्वनीवर साधला संपर्क
याबाबत भाजपा पदाधिकार्यांनी महावितरण कार्यालयात ३० जुलैला जावुन विस्कळीत वीज पुरवठ्याबाबत निवेदन दिले. ज्यामध्ये नमुद केले की, हिंगोली शहरातील शहर १ या भागातील विजपुरवठा मागील अनेक दिवसांपासुन विस्कळीत होत आहे. या संदर्भात परिसरातील बहुतांश विद्युत ग्राहकांनी भाजपा पदाधिकार्यांंकडे तक्रारी केल्या आहेत. वारंवार वीज पुरवठा(Power supply) विस्कळीत होवुन औद्योगिक ग्राहकांचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच घरगुती ग्राहकांच्या अनेक विद्युत उपकरणाचे सुध्दा नुकसान होवून दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. वास्तवीक रित्या या भागातील विद्युत देयकांची वसुली ९० टक्केच्या वर असून ही होणार्या त्रासाला विद्युत ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सुरळीत वीज पुरवठा द्यावा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला. निवेदनावर माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शहराध्यक्ष कैलाश काबरा, गोल्डी सोनी, आशिष जैस्वाल, बाबाराव घुगे, हमीद प्यारेवाले, अॅड. राजेश गोटे, मनोज शर्मा, रजनिश पुरोहित, शशांक बुर्से, किरण व्यास, राजेश पारिख, अक्षय पित्ती, सुमंत नायक, अल्का लोखंडे आदीच्या स्वाक्षर्या(signatures) आहेत.
गैरसोय सोडविण्याचे महावितरणचे आश्वासन
विस्कळीत वीज पुरवठा येत्या ५ दिवसात सुरळीत न झाल्यास भाजप (BJP)तर्फे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी महावितरणच्या अधिकार्यास भ्रमणध्वनी द्वारे विजेच्या प्रश्नांचे त्वरीत निराकरण करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी भाजपाच्या शिष्टमंडळाचे निवेदन कार्यकारी अभियंता मुंगारे यांना देण्यात आले.