परभणी/गंगाखेड(Parbhani):- शहरातील रस्त्यावर असलेल्या गाई व वासरू चोरण्याच्या उद्देशाने शनिवार रोजीच्या मध्यरात्री इनोव्हा गाडीतून आलेल्या चोरट्यांचा प्रयत्न सतर्क नागरिकांमुळे फसला. चोरट्यांनी तोंड, डोकं व पाय बांधून गाईला दिलेल्या इंजेक्शनमुळे गाय मात्र दगावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे गाय मात्र दगावली
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील संत जनाबाई मंदीरकडे जाणाऱ्या रस्त्यावर नरवाडे कॉर्नर परिसरात बसलेल्या गाय व वासरापासून काही अंतरावर शनिवार रोजीच्या मध्यरात्री २:३० वाजेच्या सुमारास एका ईनोव्हा गाडीतून आलेल्या चार अनोळखी व्यंक्तींनी चोरीच्या उद्देशाने गायीचे तोंड, डोकं व पाय बांधून तिला इंजेक्शन दिले. त्यानंतर वासराला इंजेक्शन (Injection)देत असताना तेथे असलेल्या व्यंकटेश बेद्रे, संतोष टोले व परमेश्वर नरवाडे आदी नागरिकांनी आरडाओरडा केल्याने चार ही व्यक्ती ईनोव्हा गाडीतून फरार झाले. या घटनेची माहिती पोलीसांना देऊन याचवेळी पशू वैद्यक महावीर वाव्हुळे यांना बोलावून घेत गायीवर उपचार सुरू करण्यात आले. मात्र रविवार दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वाजे दरम्यान गाय दगावली आहे.
याप्रकरणी व्यंकटेश बेद्रे यांनी चार अनोळखी व्यंक्तींविरुद्ध गाय व वासरू चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांना निर्दयीपणे बांधून इंजेक्शन दिल्यामुळे गाय दगावल्याची फिर्याद दिल्यावरून प्राण्यांचा छळ अधिनियम व महाराष्ट्र पशु संरक्षण (Maharashtra Animal Protection) अधिनियमाच्या विविध कलमान्वये गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास बिट जमादार गौस खान पठाण हे करीत आहे.