प्रहार:रविवार दि. 22 सप्टेंबर 2024
लेखक : प्रकाश पहरे,
संपादक, दैनिक देशोन्नती, दैनिक राष्ट्रप्रकाश
अंधश्रद्धेचा कॅन्सर कधी बरा होणार..?
आपल्या लोकांना सर्वत्र भट हवाच असतो. त्याच्याशिवाय आमचे पान हलत नाही. डॉक्टरांच्यात जसा ‘कट प्रॅक्टीस’ प्रकार असतो तसाच इथे पण असतो. शांती सुचवणाऱ्यांचे कमिशन असते. शांती करणारा भट शांतीच्या नावाखाली हजारो रुपयांचा चुना लावतो. ज्याने शांती सुचवली व शांतीसाठी पाठवले त्यालाही कमिशन दिले जाते. ही साखळी आहे आणि या साखळीचा हा धंदा खूप तेजीत आहे. शिकले – सवरलेले लोकही या गोष्टी करतात हे पाहून हसावे की रडावे हेच कळत नाही. विशेष म्हणजे यातील बहुतेक गोष्टी बहुतेक भट करत नाहीत. ना गणपती, ना देवी बसवत, ना तेरवी घालत..
समाजाचे प्रबोधन करत करत कित्येक लोक खपले. एकेकाने आपले आयुष्य पणाला लावले. सर्व संतांनी कानी- कपाळी ओरडून ओरडून सांगितले. महाराष्ट्राच्या मातीत झालेल्या संतांच्या मांदियाळीने लोकांना विविध प्रकारे समजावले; पण अजूनही समाजाचे मस्तक सुधारलेले नाही. अजूनही त्याच्या धडावर त्याचे मस्तक आलेले नाही. त्याच्या डोक्यात ठाण मांडून बसलेल्या अंधश्रद्धा अजूनही संपलेल्या नाहीत. या मानसिक रोग्यांना कधी जाग येईल असे वाटत नाही. अजून किती पिढ्या अशाच मानसिक गुलामीत संपणार आहेत ? हा प्रश्न सतत अस्वस्थ करत राहतो. हे चित्र पाहिले, की संतांनी आपले जीवन या लोकांसाठी व्यर्थ का घालवले? असा प्रश्न पडतो. गौतम बुद्ध, संत तुकाराम, संत सावता माळी, संत सेना, संत चोखोबा, संत जनाई, मुक्ताई, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, अशा मांदीयाळीने एवढेच कशाला अगदी शिवाजी महाराजांनी, संभाजी राजांनी, शाहू महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी आपले अखंड आयुष्य वेचले. कैक संतांनी तर या येड्या भाबड्या समाजासाठी बलिदान दिले;तरीसुद्धा हा समाज असाच अंधश्रद्धांना कवटाळून का बसतो ? हा प्रश्न अस्वस्थ करून सोडतो.
परवा एका शाळेत जायचा योग आला होता. सदर शाळेत एका विद्यार्थ्याला त्याच्या वर्ग शिक्षकांनी विचारले, की ‘तू परीक्षेला का आला नव्हता ? दोन पेपर बुडवलेस, कुठे होतास?’ यावर त्या विद्यार्थ्याने जे उत्तर दिले ते भयंकर होते. बहुजनांच्या ‘मती’ची ‘माती’ कशी झाली आहे, याचा अस्सल पुरावा देणारे ते उत्तर होते. सदर विद्यार्थ्याने सांगितले, की ‘माझी शांती करायची होती, घरचे मला शांती करण्यासाठी घेऊन गेले होते, म्हणून मी परीक्षेला आलो नव्हतो !’ त्याचे उत्तर खूप अस्वस्थ करून गेले.
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
।। नीतिविना गती गेली ।।
।।गतिविना वित्त गेले।।
।। वित्ताविना शुद्र खचले।।
।। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
असे महात्मा फुलेंनी लिहिले आहे; पण त्यांनाही या शिक्षित असलेल्या अंधश्रद्ध बहुजन समाजाने चुकीचे ठरवले आहे. या बहुजन समाजाला विद्या मिळावी म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी आयुष्य वेचले. स्वतःचे अवघे जीवन पणाला लावले. मात्र, विद्या घेऊनही समाज मानसिक गुलामीतून बाहेर पडायला तयार नाही . पोराची परीक्षा सोडून त्याचे आई-बाप त्याला शांती करायला घेऊन जातात. त्याचे दोन पेपर बुडवून शांती केली जाते ! हा प्रकारच भयंकर आहे. आजही हे घडावे?
भटांना काय दोष द्यायचा? शांतीसाठी लोक हजारो रुपयांची माती करतात, भटांची भरती करतात आणि त्यासाठी पोरांच्या शिक्षणाचीही माती करावी ? भटांना देव, ग्रह अंकित असतात का? त्यांनी कुठल्यातरी नदीकाठी पुटपुटून ग्रह शांत होतो का? घरात बायको त्यांना चोपते हे तिला शांत करू शकत नाहीत आणि ग्रह कसे शांत करणार? पण अंधश्रद्धेची भांग प्यायलेल्या बहुजनांना बुद्धी कधी येणार? हा खरा प्रश्न आहे.
अकोला शहरातील माझ्या एका मित्राचे घर अशाच एका महाराजाने भाड्याने घेतले होते. एकेदिवशी सदर मित्राच्या घरी गेल्यावर त्याने जी माहिती दिली ती इथे जशीच्या तशी देतो. त्याच्या घरी राहिलेल्या त्या महाराजाकडे वेगवेगळ्या समस्यांकरिता शांती करायला खूप लोक यायचे. त्याने शांतीसाठी मांडलेला पाट अनेक वर्षे बदलला नव्हता. तो पाट व त्या पाटावरील साहित्य सर्व प्रकारच्या शांतीसाठी तो वापरत होता. ग्राहक बदलत होते, शांतीचे प्रकार बदलत होते; पण पाटावरचे साहित्य मात्र कधीच बदलत नव्हते. कित्येक तरुणांची लग्न ठरत नाहीत म्हणून, किंवा गृह कलह आहे म्हणून ते शांती करायला यायचे व शांती करून जायचे. विशेष म्हणजे जो भट शांती करायला आलेल्यांची लग्न व्हावे म्हणून शांती करत होता त्याचीच बायको एक दिवस पळून गेली. शांती करता करता त्याने बक्कळ माया जमवली होती. शांतीच्या जीवावर त्याने साठ लाखांची एक आणि चाळीस,लाखांची एक अशा दोन गाड्या खरेदी केल्याची किंवा कुणीतरी त्याला गिफ्ट दिल्याची माहिती मला त्या मित्राने दिली. आता यात महाराजाला काय दोष द्यायचा? तो त्याचे दुकान मांडून बसलाय, जायचे की नाही ती ग्राहकाची इच्छा. तो थोडाच डोक्याला रिव्हॉल्वर लावून नेतो? आम्हालाच इतकी कमी बुद्धी, की महाराज आल्याशिवाय आमचे पान हलत नाही. त्याच्या पायाच्या तीर्थाचे आचमन केल्याशिवाय आमचे पोट साफ होतच नाहीय. आई मेली भट हवा, बाप गेला भट हवा, लग्न केले भट हवा, घर बांधले भट हवा, दुकान चालू केले भट हवा, लग्न ठरवायचेय तर भट हवा. मुलगी-मुलगा पाहायला जायचेय तर भट हवाच. पत्रिका पाहायला भट पाहिजेच पाहिजे. लग्नाची तारीख ठरवायची आहे तरी भट हवाच. लग्न लावायला भट हवा, मुलं झाले तर नाव ठेवायला भट हवा, कुठे जायचेय, मुहूर्त काढायचाय तर भट पाहिजेच. त्यांचा कुठलाच कार्यक्रम भटाशिवाय होत नाही. तरी बरं पोरं जन्माला घालायलाच अजून भटाची गरज वाटत नाही. हा एकच विभाग सोडला, तर आपल्या लोकांना सर्वत्र भट हवाच असतो. त्याच्याशिवाय आमचे पान हलत नाही. डॉक्टरांच्यात जसा ‘कट प्रॅक्टीस’ प्रकार असतो तसाच इथे पण असतो. शांती सुचवणाऱ्यांचे कमिशन असते. शांती करणारा भट शांतीच्या नावाखाली हजारो रुपयांचा चुना लावतो. ज्याने शांती सुचवली व शांतीसाठी पाठवले त्यालाही कमिशन दिले जाते. ही साखळी आहे आणि या साखळीचा हा धंदा खूप तेजीत आहे. शिकले- सवरलेले लोकही या गोष्टी करतात हे पाहून हसावे की रडावे हेच कळत नाही. विशेष म्हणजे यातील बहुतेक गोष्टी बहुतेक भट करत नाहीत. ना गणपती, ना देवी बसवत, ना तेरवी घालत.
मात्र आजही बहुजन समाज (Bahujan Samaj)असाच डोके गहाण ठेवून वागतो..? आजही भटांच्या कपोलकल्पित थोतांडाला कवटाळून जगतो. त्याला योग्य काय , अयोग्य काय? हे कळत नाही? लोकांना समजवता समजवता किती महापुरुष खपले? कित्येकांनी जीव गमावले. महात्मा बसवेश्वर मारले, संत कबीर मारले, संत तुकाराम मारले. तुकोबारायांचा तर या बडव्यांनी खून केला आणि ते सदेह वैकुंठाला गेल्याची थाप ठोकून दिली आणि दुर्दैव म्हणजे आमच्या बहुजन समाजाला ती खरी वाटली. विशेष म्हणजे आजही या विज्ञान युगात ही थाप खरी वाटते. तुकारामांचा खून झाला होता म्हटले, तर लोक अंगावर येतात. ते सदेह वैकुंठालाच गेल्याचे ठासून सांगतात. आमचे लोक शिकले- सवरले पण भटशाहीने नासवलेला त्यांचा मेंदू सरळ झालाच नाही. शिक्षणानेही त्यांच्या मेंदूला चढलेला अंधश्रद्धेचा गंज निघाला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला ‘वाघिणीचे दूध’ म्हटले; पण बहुजन समाजाने त्यांना चुकीचे ठरवत शिक्षणाला नागिणीचे विष बनवले . प्रबोधन करणाऱ्या संतांचे, महात्म्यांचे, राजांचे खून पाडले. ही खुनाची परंपरा बृहद्रथ मौर्य ते आजतागायत चालू आहे.
पानसरे, दाभोळकरांच्या पर्यंत हे खूनसत्र आलेय. प्रबोधन करणाऱ्या लोकांचे मुडदे पाडण्याचे सत्र आजही सुरूच आहे. तरीही बहुजन समाजाच्या डोक्याला झालेला अंधश्रद्धेचा कॅन्सर बरा व्हायला तयार नाही, हा खूप अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. महात्मा फुल्यांनी शिवरायांची समाधी शोधल्यानंतर सुरू केलेल्या शिव जयंतीला तोडीस तोड म्हणून टिळकांनी गणेश उत्सव सुरू सुरू केला. केला. त्याला शूद्रशिवले म्हणून मग ती मूर्ती शिरविण्याची शक्कल टिळकांनी लढवली, आणि रुजवली तिने आज विक्राळ रूप घेतले आहे. गणेश मंडळांची संख्या एकट्या पुणे शहरात यावर्षी म्हणे साडेतीन लाखांवर पोहचली होती, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ती कोटीच्या घरात नक्कीच असेल. लाल बागचा राजा, पुण्याचा दगडूशेठ, यांसारखे राज्यात बसवलेले हजारो प्रसिद्ध गणपती आणि त्यासमोर दहा दिवस बहुजन आणि अगदी बुद्ध धर्मियांचा चालणारा धिंगाणा आणि जमा होणारे पैसे हे सगळे पाहिले म्हणजे ‘बुडते हे जग देखवेणा डोळा’ म्हणत, गणराया तू जर खरंच बुद्धीची देवता आहेस, तर यांना बुद्धी दे असेच म्हणावेसे वाटते !
लेखक: प्रकाश पोहरे
प्रतिक्रिया देण्यासाठी 98225 93921 वर ‘थेट प्रकाश पोहरेंना संपर्क करा किंवा आपल्या प्रतिक्रिया याच व्हॉट्सअप वर पाठवा.’ प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहायला विसरू नका.