युवा शेतकरी कैलास नागरेंचे आत्मसमर्पण वाया जावू देणार नाही: प्रकाशभाऊ पोहरे
बुलढाणा (Prakash Pohare) : शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरेंनी (Kailas Nagare) होळीच्या दिवशी १३ मार्च रोजी ४ पानांची चिठ्ठी लिहून संपविलेल्या जीवनयात्रेमुळे व्यथीत होवून, शेतकरीनेते प्रकाशभाऊ पोहरे (Prakash Pohare) यांनी उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड.अविनाश काळे यांच्या समवेत गुरुवार २० मार्च रोजी शिवनी आरमाळला जावून नागरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यामागची कथा अन् व्यथा एैकून आधी भावूक व नंतर संतप्त झालेल्या प्रकाशभाऊंनी अंढेरा फाट्यावर येवून स्थानिक शेतकर्यांसमवेत थेट ‘रास्ता रोको’ आंदोलन केल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती.
भर दुपारच्या उन्हात रस्त्यावर बसून तहसिलदार कदम मॅडम यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला, त्यानंतर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे तिथेच ठरल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले होते. याच अनुषंगाने आज शुक्रवार २१ मार्च रोजी जिल्हाधिकार्यांच्या दालनात मॅरेथॉन बैठक पार पडली. तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत प्रत्येक मुद्यावर सविस्तर चर्चा झाली, अनेक वाद झालेत..शेवटी संवादातून या विषयावर प्रस्ताव तयार करुन तो तातडीने शासनाकडे पाठविण्याचे ठरले. अनेक विषय मार्गी लागले. पण शेतकर्यांच्या विषयासाठी त्यातल्यात्यात सिंचनासाठी सरकार गंभीर नसल्याचे, प्रकाशभाऊ पोहरे (Prakash Pohare) यांनी सांगून युवा शेतकरी कैलास नागरे यांचे आत्मसमर्पण वाया जावू देणार नाही, अशी भूमिका किसान ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशभाऊ पोहरे यांनी व्यक्त केले.
बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पाटबंधारे विभाग व पाणी पुरवठा विभागाच्या संबंधित अधिकार्यांसोबत स्व. कैलास नागरे आत्मसमर्पण प्रकरणी त्यांनी चिठ्ठीत लिहलेल्या मागण्यांवर बैठक सुरु झाली. यावेळी प्रकाशभाऊ पोहरे, सिंचन शोध यात्रेचे प्रमुख अविनाश काळे, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर, किसान ब्रिगेडचे प्रदेश महासचिव अॅड.सतिषचंद्र रोठे, १४ गाव पाण्यासाठींची मागणी लावून धरणारे भगवान मुंढे, दिलीप सानप तथा या परिसरातील शेतकरी, शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख लखन गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश सोनुने, विठोबा डोईफोडे आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत जे मुद्दे प्रामुख्याने चर्चिल्या गेले त्यात युवा शेतकरी कैलास नागरे (Kailas Nagare) यांनी त्यांच्या राहत्या घरी आपली जीवनयात्रा संपवली. त्या घरात भेट दिली व त्यांच्या कुटुंबीयांसमवेत चर्चा केली व त्यांना सांत्वना दिली. सदर चर्चेदरम्यान मयत कैलास नागरे यांच्या कुटुंबियाने जे कागदपत्र आम्हास दिले त्यामध्ये स्व.कैलास यांनी जे पत्र लिहिलं त्याचा समावेश आहे. ते सर्व कागदपत्र बघितल्यानंतर अनेक धक्कादायक तथ्य समोर आले.कृपया आपण ह्या तथ्यांचा मानवतापूर्ण दृष्टिकोन ठेवून सकारात्मक विचार करावा.
दिनांक २०/१२/२०२४ रोजी श्री नागरे (Kailas Nagare) यांना उपोषण संपवण्याची विनंती करण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकार्यांनी असे आश्वासन दिले की २४/१२/२०२४ रोजी जिल्हास्तरीय बैठक कार्यकारी अभियंता यांचे दालनात आयोजित करण्यात येईल आणि या बैठकीत जिल्हाधिकारी यांची पुढील बैठक तारीख घेऊन कळवण्यात येईल. हे पत्र दिल्यानंतर नागरे यांनी परत स्मरण पत्र पाठविले, यानंतर दिनांक २१/०१/२०२५ रोजी तहसीलदार दे. राजा यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना विनंती केली की, कैलास नागरे यांची जिल्हाधिकारी व संबंधित विभाग प्रमुख यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात यावी. यानंतर दिनांक २३/०१ /२०२५ रोजी कैलास अर्जुनराव नागरे यांना २६/०१/२०२५ सुरू होणार्या उपोषणापासून पासून परावृत्त व्हावे, अशी विनंती करणारे पत्र कार्यकारी अभियंता खडकपूर्णा प्रकल्प देऊळगाव राजा यांनी लिहिले.
मुख्यत्वे करून या पत्राबाबत आम्हाला आपणासोबत चर्चा करायची आहे, मुळात हे पत्र आक्षेपार्र्ह तसेच संभ्रम निर्माण करणारे आणि अतिशय उडवाउडवी चे उत्तर देणारे आहे. याला कारण सदर पत्रामध्ये कार्यकारी अभियंता असे नमूद करतात की, खडकपूर्णा प्रकल्पाखाली १९०४७ हेक्टर सिंचन क्षेत्र सिंचनाखाली येते. पण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांसमोर मुख्य सचिव नितीन करीर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार खडकपूर्णा धरणामुळे २२,८५६ हेक्टर जमीन ओलीताखाली आली असल्याचे सांगितले व हे धरण १३/०८/२००७ रोजी पूर्ण झाले असल्याचे नमूद केले आहे. याचा अर्थ एकतर मुख्य सचिव उच्च न्यायालयाची दिशाभूल करत असावेत किंवा कार्यकारी अभियंता यांनी कैलास नागरे (Kailas Nagare) यांना जे पत्र पाठवले आहे.
त्यामधील सिंचन क्षेत्राचा दिलेला आकडा खोटा असावा. या २ पत्रांमुळे संभ्रम निर्माण होत असून याबाबतचा खुलासा आपण कार्यकारी अभियंताकडून मागवावा. वरील दोन आकड्यांमध्ये अंदाजे ३८४९ हेक्टर ची तफावत दिसून येते. नागरे यांच्या विनंतीनुसार केवळ १५०० हेक्टर जमीन ओलिताखाली त्यांना हवी होती.कार्यकारी अभियंता आपल्या पत्रात असे नमूद करतात, सद्यस्थितीत नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पाचे नियोजन सुरू असून.. त्यामधून अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यास आपल्या मागणीप्रमाणे पाणी पुरवणे शक्य होईल. वरील विधान धक्कादायक असून निंदनीय देखील आहे. याचे कारण असे की अजूनपावेतो नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पाचे काम कुठल्याही स्वरूपात सुरू झालेले नाही. तर ह्या अर्थसंकल्पात केवळ तात्विक मान्यता दिलेली आहे. अशाप्रकारे कार्यकारी अभियंत्याने नागरे यांच्या उपोषणाची केलेली थट्टा अतिशय गंभीर आहे.
तेव्हा या निवेदनाद्वारे आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नागरे (Kailas Nagare) यांनी आपली जीवनयात्रा संपवली ती केवळ उदात्त भावनेने प्रेरित होऊन शेतकर्यांच्या कल्याणासाठी केलेले बलिदान होय, अशी आमची भावना आहे. नागरे यांचे बलिदान व्यर्थ जावू द्यायचे नसेल तर जिल्हाधिकारी यांनी या भागातील शेतकर्यांच्या तीव्र भावना शासनास विशेषत: पालकमंत्र्यांना कळवून तात्काळ या विषयावर पालकमंत्री मकरंद पाटील व आ.मनोज कायंदे व स्वत: जिल्हाधिकारी आपण आणि संबंधित शेतकरी यांचे बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घ्यावा. त्याचप्रमाणे शासनाने नागरे यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी देखील या चर्चेदरम्यान करण्यात आली. यावेळी प्रकाशभाऊ पोहरे (Prakash Pohare) यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
बोलता-बोलता प्रकाशभाऊ रडतात तेंव्हा..
शेतकरीनेते प्रकाशभाऊ पोहरे (Prakash Pohare) कैलास नागरे आत्मसमर्पण प्रकरणी अतिशय गंभीर दिसले. काल त्यांनी दुपारच्या उन्हात रस्त्यावर बसून रास्ता रोको केला. त्यांना चर्चेसाठी जिल्हाधिकार्यांनी वेळ दिला, त्यानुसार आज २१ मार्च रोजी ते बुलढाणा येथे आले. या ठिकाणी अनेक शेतकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी प्रस्तावना करतांना, आपण शेतकरी आत्महत्येचा मुद्या हा २००१ ते २००७ पर्यंत उचलला, त्यामुळेच कर्जमाफी झाल्याचे त्यांनी मात्र कर्जमाफी हा कायमस्वरुपी उपाय नसल्याचे त्यांनी कैलास नागरे यांच्या घरी दिलेली सांत्वनपर भेट व सध्या शेतकरी ज्या अवस्थेतून जात असून राज्यकर्त्यांची त्याबाबतची उदासीनता.. हे सर्व बोलत असतांना प्रकाशभाऊंचा (Prakash Pohare) कंठ दाटून आला, अन् बोलता बोलता ते अक्षरश: रडायला लागले. यावेळी त्यांना ज्येष्ठ विधीज्ञ अविनाश काळे यांनी धीर दिला व खुद्द जिल्हाधिकारी किरण पाटील भाऊंसाठी पाणी मागवले.
प्रत्येक मुद्दा सखोल, व त्यावरची चर्चाही तेवढीच सविस्तर..
या मॅराथॉन बैठकीत शिवणी अरमाळ व त्या १४ गावासंदर्भातला प्रत्येक मुद्दा सविस्तरपणे चर्चिल्या गेला. प्रत्येक मुद्यावर तिथे उपस्थित सिंचन विभाग व पाणीपुरवठा विभागाकडून त्याचठिकाणी उत्तर घेण्यात आले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील हे प्रत्येक मुद्दा समजून घेऊन त्यावर चर्चा घडवून आणत होते. याच चर्चेदरम्यान त्यांनी पाटबंधारे विभागाच्या सचिवांनाही फोन केला, समोर बसलेल्या आंदोलनकर्त्यांच्या भावना त्यांना समजून सांगून कुठल्याही परिस्थितीत हा पाणी प्रश्न सोडविल्या गेला पाहिजे, अशी भावना त्यांची होती. अॅड.अविनाश काळे यांनी ज्याप्रमाणे कोर्टात क्रॉसींग चालते, त्याप्रमाणे प्रत्येक मुद्यावर अधिकार्यांना क्रॉस केले. त्यांची बाजू समजून घेतली. त्यावर मार्गही काढण्यासाठी काही उपाययोजना सांगितल्या. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही या चर्चेत भाग घेतला. भगवान मुंडे व दिलीप सानप यांनी स्थानिक समस्या (Prakash Pohare) सांगितल्या. बैठक झाली, सखोल तेवढीच सविस्तर!