बुलढाणा (Prataprav Jadhav) : निवडणूक ही तात्पुरती आरोप-प्रत्यारोपाची असते. जय-पराजय हा जिव्हारी लावायचा नसतो. विकासाचे राजकारण करण्याची मिळणारी संधी म्हणजे राजकारण होय. हेच राजकारण प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) आपल्या अख्ख्या राजकीय कारकीर्दीत करत आले आहेत. खासदार म्हणून जिल्ह्यासाठी त्यांनी भरीव विकास निधी खेचून आणत कामेही पूर्णत्वास नेली. आता तर केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यामुळे मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली असून याच संधीचे सोने करत जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा नियमित वाहती ठेवता येईल, यासाठी झटत राहील, अशी ग्वाही नामदार प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी तमाम जनतेला दिली आहे.
ना. प्रतापराव जाधव यांच्या भूमिकेचे जिल्हाभरातून समर्थन
फक्त आणि फक्त विकास हेच ध्येय समोर ठेवून कार्य करायचे आहे, त्यासाठी सर्वांनी हेवे दावे विसरून एकदिलाने काम करावे, मला सहकार्य करावे, असे भावनिक आवाहन ना. जाधव यांनी समाजमाध्यमांवरही केले आहे. त्यांच्या या भूमिकेला जिल्हाभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विकासाचे राजकारण हे जनतेच्या हिताचे असल्याने ठिकठिकाणी प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांच्या एकदिलाने काम करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील ज्येष्ठ नागरिक तथा जानकीदेवी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, शेणफडराव घुबे यांनी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या आवाहनाचे स्वागत करत सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून सर्वांनी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने नामदार जाधव यांचे हात बळकट करण्यासाठी पुढे येऊन हेवेदावे विसरण्याचा लाख मोलाचा सल्ला दिला आहे.
हेवेदावे विसरून काम करण्याचे आवाहन
शांत, संयमी नेते असलेले प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी कधीच कपटी राजकारण केले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या धोरणानुसार त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यातच विकास एके विकास याचाच पाढा वाचणारे प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) जिल्हावासियांनी जवळून अनुभवले आहेत. त्यामुळेच नागरिकांनी चौथ्यांदा विश्वास टाकत त्यांना संसदेत पुन्हा नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. संसदेत जिल्ह्याचे नेतृत्व करत विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. विकास कामे ही पूर्ण केली. खासदारकीच्या काळातील प्रस्तावित कामेही करणे बाकी आहेत.
सोशल मीडियावर होतेय निर्णयाचे स्वागत
ती कामे पूर्णत्वास नेण्यासह नव्याने जिल्ह्यात मोठ मोठे प्रकल्प आणून जिल्ह्याचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. सुशिक्षित बेरोजगार व अन्य घटकातील लोकांना रोजगार देण्यासाठी औद्योगिक प्रकल्पदेखील आणण्याचा मनोदय प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी केला आहे. हा मानस पूर्ण करण्यासाठी जिल्हावासियांकडूनही त्यांना सहकार्याच्या अपेक्षा आहेत. राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या नजरेतून पाहणारा चष्मा सर्वांनी चढविणे गरजेचे असल्याचा उल्लेख करणाऱ्या पोस्ट सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहेत. ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी निवडणूक संपली, आता एकत्र येत विकास करूया. असे केलेले आवाहन राजकीय नेत्यांसह सर्वांनीच मनावर घेतल्यास नक्कीच जिल्ह्याचा कायापालट होईल, अशा प्रतिक्रिया देखील जिल्हाभरातून उमटू लागल्या आहेत.