उदगीर येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत सक्षमीकरण आनंद मेळावा संपन्न
उदगीर/लातूर (CM Ladki Bahin Yojana) : राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महनीय महिलांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रगतीचा पाया घातला आहे. त्याच राज्यात शासनाने आता महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावले उचलून त्यांच्या स्वावलंबन, निर्णय शक्तीत वाढ केली आहे. महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला आहे, अशा शब्दांमध्ये देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह (CM Ladki Bahin Yojana) सुरु असलेल्या आर्थिक विकासाच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत (CM Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचे कौतुक करत महिला सक्षमीकरणाला राज्य शासन चालना देत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
सक्षमीकरण योजनांमुळे महिलांच्या स्वावलंबन व निर्णयशक्तीत वाढ
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. तर विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्राम विकास आणि पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांचीही उपस्थिती होती.
यावेळी त्यांनी उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित महिलांशी संवाद साधायला मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, मी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांसह महिलांच्या अन्य (CM Ladki Bahin Yojana) योजनांची माहिती घेतली. याशिवाय राज्यात लखपती दिदी योजनेला मिळत असलेल्या प्रतिसादाचाही आढावा घेतला. या योजनांचे दृष्य परिणाम दिसत असल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी ते सिंधुताई सपकाळांपर्यंत अनेक आदर्श महिलांपुढे आहेत. महिलांची लोकसंख्या देशाच्या अर्ध्या लोकसंख्येइतकी आहे. प्रत्येक कुटुंबात उदरनिर्वाह चालविण्यासाठी महिलांची मुख्य भूमिका असते. त्यामुळे महिलांनी आता राजकीय क्षेत्रातही पुढे येत देशाचे नेतृत्व करावे, असे आवाहनही त्यांनी याठिकाणी जमलेल्या महिला व युवतींना केले.
पुरुषांची उपस्थिती लक्षात घेऊन त्या म्हणाल्या, पुरुषांनी आता महिलांच्या क्षमतेला ओळखून त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी पाठबळ द्यावे. तसेच आमच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान करणे पुरुषार्थ मानला जातो. प्रत्येक कुटुंबामध्ये हा सन्मान दिसून आला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महिलांनी सर्व आघाड्यांवर अग्रेसर राहताना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी वडीलकीच्या भूमिकेतून केली.
लाडकी बहीण योजना सुरुच राहील: मुख्यमंत्री
राष्ट्रपती महोदयांचे प्राचीन आणि ऐतिहासिक शहर असलेल्या उदगीर शहरात आल्याबद्दल स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासनामार्फत सुरु असलेल्या महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच राष्ट्रपतींच्या जीवनातील संघर्ष हा सर्वसामान्य महिलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेल्या संघर्षामुळेच आज त्या देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्या आहेत. या ठिकाणी उपस्थित महिलांना राष्ट्रपती महोदयांच्या यशाचे कौतुक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे वाटप
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे स्पष्ट करत राज्य शासनाने केंद्र शासनाच्या लखपती दिदी योजनेसह मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना, अन्नपुर्णा योजना, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी योजना यासह महिलांच्या सशक्तीकरणावर भर असलेल्या योजनांमुळे शासन सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) बंद होणार नाही ती पुढेही चालूच राहणार आहे. माझी एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि माता भगिनींचा आशीर्वाद कायम राहिल्यास दीड हजाराची रक्क्म वाढविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आर्थिक महासत्ता बनण्याकडे अग्रेसर असून, अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आम्ही झेप घेतली आहे. महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत कायम आघाडीचे राज्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. संविधान बदलाच्या अफवेला त्यांनी फेटाळून लावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सामान्य कुटुंबातील एक संघर्षशील महिला आपल्यापुढे राष्ट्रपती म्हणून विराजमान आहेत. तर मागास वर्गीयाचे प्रतिनिधीत्व नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. स्थानिक आमदार व मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर जिल्हा करण्याची तसेच उदगीर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची मागणी आपल्या प्रास्ताविकात केली होती. त्याचा उल्लेख करताना त्यांनी सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, असे सांगितले.
संविधान बदलू शकणार नाही: रामदास आठवले
राज्य, देशाच्या विकासासाठी आणि संविधान मजबूत करण्यासाठी सर्वजण प्रयत्नरत असून, देशाचे कोणीही संविधान बदलू शकत नसल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच राज्याची विकासाची गाडी पुढे नेताना महिलांना आर्थिक ताकद देत त्यांनाही विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
घटनारक्षण प्रथम कर्तव्य: देवेंद्र फडणवीस
उदगीर येथील विश्व शांती बौद्ध विहार निर्मिती व आज महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन केले. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारावर चालणारा जपानसह आशियातील अनेक देश विकसित झाले आहेत. जगातील सर्वात उत्तम संविधान हे भारताचे असून, ते कोणीही बदलू शकणार नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र व राज्य शासन संविधानानुसारच काम करत आहे. केंद्र शासनाच्या नेतृत्वात राज्य शासनाने केंद्र शासनाकडून चैत्यभूमीची जागा परत घेतली आहे. तसेच लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर लिलावात विकत घेतले आहे. शिवाय जपानमधील कोयासन विद्यापिठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. या विकास प्रक्रियेत महिलांचाही तेवढाच महत्त्वपूर्ण सहभाग राहणार असल्यामुळे केंद्र व राज्य शासन पुरस्कृत महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांचा त्यांनी उल्लेख केला. त्यामध्ये मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांसह लखपती दिदींचा आवर्जून उल्लेख केला. या (CM Ladki Bahin Yojana) योजना बंद पडणार नाहीत, याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
सक्षमीकरणात महाराष्ट्र प्रथम: आदिती तटकरे
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात 1 कोटी 60 लाखांपेक्षा जास्त महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिल्याचे सांगत लवकरच अडीच कोटीवर महिलांना लाभ मिळेल, असे महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या या (CM Ladki Bahin Yojana) योजनेतून राज्यातील महिलांच्या विकासात मोठा बदल घडून येणार असून, महिलांच्या विकासात कोणतीही कसर राहणार नाही. महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. राज्यात बालकांच्या नावापुढे आईचे नाव लावणारे हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या सक्षम नेतृत्वात महिला व बालविकास विभागांतर्गंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिक प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा व मेडिकल द्या: संजय बनसोडे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर येथील विश्वशांती बुद्धविहाराचे महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले असून, बुद्धाच्या शांततेच्या विचार मार्गावरूनच जगाला पुढे जावे लागणार आहे. उदगीरातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला जातो, असे सांगताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वात (CM Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पुरोगामी महाराष्ट्रात नवा प्रकाशमार्ग निर्माण केला आहे. यावेळी त्यांनी उदगीर शहराच्या विकासकामांची उपस्थितांना माहिती देत त्यांच्या नेतृत्वात राज्य, जिल्ह्याचा विकास होतो आहे. त्यामुळे उदगीरमध्ये जिल्ह्याची क्षमता असून, उदगीरची जिल्हा निर्मिती करावी तसेच येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्याची मागणी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी मागणी केली.
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते आज उदगीर येथे ‘शासन आपल्या दारी’ या पुस्तकाचे विमोचन झाले आणि त्याची पहिली प्रत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेट देण्यात आली. राष्ट्रपती मुर्मू आणि राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज महिलांना लाभवाटप करण्यात आले. कार्यक्रमाला वेगवेगळ्या पेहरावात जिल्ह्यातील महिला आल्या होत्या. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि डोळे दीपवणाऱ्या आयोजनामुळे हा कार्यक्रम स्मरणीय ठरला. जिल्हा प्रशासन गेले अनेक दिवस या (Ladki Bahin Yojana) कार्यक्रमासाठी मंत्री संजय बनसोडे व जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या नेतृत्वात झटत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती अंबेकर यांनी केले.