परभणी(Parbhani):- पलिकडच्या गल्लीत चाकू लावून अंगठ्या (Rings)काढून घेत आहेत, तुम्ही तुमच्या हातातील अंगठ्या काढून घरी ठेवून द्या, असे म्हणत वृध्दाजवळील अंगठ्या घेवून त्या एका पुडीत बांधून परत दिल्या. वृध्दाने पुडी खोलून पाहिल्यावर त्यामध्ये अंगठ्यांऐवजी खडे दिसून आले. भामट्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर वृध्दाने नवा मोंढा पोलिसात तक्रार दिली. फसवणुकीची(Fraud) ही घटना रविवार २३ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास वसमत रोडवर घडली. या प्रकरणी २६ जुनला तक्रार देण्यात आली.
परभणीच्या नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, सखाराम मसाजी बोबडे हे २३ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पंढरपुर येथून परभणीला आले. अॅटो पकडून वसमत रोडवरील शिवशक्ती बिल्डींग जवळ उतरले. त्यानंतर शिवराम नगर येथील घराकडे जात असताना त्यांना दोन अनोळखी व्यक्ती भेटले. संबंधितांनी सखाराम बोबडे यांना पलिकडच्या गल्लीत चाकू (Knife) लावून अंगठ्या काढून घेत आहेत, तुम्ही तुमच्या अंगठ्या काढून घरी ठेवून द्या, असे म्हणाले. फिर्यादी आपल्या जवळील अंगठ्या काढत असताना एकाने त्यांच्या हातातील दोन अंगठ्या काढून कागदामध्ये पुडी बांधून दिल्या. थोड्या वेळाने सखाराम यांनी पुडी खोलून पाहिल्यावर त्यांना आतमध्ये अंगठ्यांऐवजी खडे दिसून आले. भामट्यांनी ७१ हजार ६३० रुपये किंमतीच्या अंगठ्या लंपास करत फसवणूक केल्या प्रकरणी नवा मोंढा पोलिसात(Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.