गडचिरोली (Gadchiroli) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ५ हजार जॅकेट आहेत. एकेका जॅकेटची किंमत १० लाख रूपये आहे. मोदी (Modi)हे भोगी असून आता सत्तेचा उपभोग घेत आहेत असा आरोप काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
गडचिरोलीतील काँग्रेसच्या शेतकरी न्याय यात्रेस उदंड प्रतिसाद
जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आज १२ जून रोजी गडचिरोली येथे आयोजित शेतकरी मेळावा तसेच शेतकरी न्याय यात्रेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते आ.विजय वड्डेटीवार, खा.डॉ. नामदेव किरसान, खा. प्रतिभा धानोरकर, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव कुणाल चौधरी, आ.रामदास मसराम ,आ.अभिजीत वंजारी, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आ. सुभाष धोटे, निरीक्षक सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, रवींद्र दरेकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. विश्वजीत कोवासे, प्रकाश इटनकर, माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम , माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी , सतीश वारजूरकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्षा अॅड कविता मोहरकर आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीला फडणवीसस्थान करणार आहेत. स्थानीकांच्या हक्कावर गदा आलेली आहे. गोरगरिबांच्या पाठीशी राहण्याची आमची भूमिका आहे. मुंबई (Mumbai) ही मराठी माणसाची आहे. पण मुंबईमध्ये एकही मराठी माणूस दिसत नाही. मराठी माणसाला मुंबई मधून बाहेर फेकल्या जात आहे असेही सपकाळ म्हणाले.




