मानोरा (Washim):- बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवीत नवरात्रौत्सवाच्या पर्वावर दि. ५ ऑक्टोंबर रोजी शनिवारला सकाळी १० वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)बंजारा विरासत नंगारा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमाला येणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी हे राज्यातील १०० शेतकऱ्यांशी (Farmers) संवाद साधणार असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
पंतप्रधान मोदी हे राज्यातील १०० शेतकऱ्यांशी संवाद साधणार
बंजारा समाजाची संस्कृती, परंपरा आदीचे जतन होण्यासाठी कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) तथा यवतमाळ – वाशीम जिल्हयाचे पालकमंत्री (Guardian Minister) संजय राठोड यांनी अथक प्रयत्न करून सहा वर्षात राज्य शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी आणून जागतिक दर्जाचे बंजारा विरासत नंगारा वास्तू संग्रहालयाची उभारणी केली आहे. या वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह राज्य व केंद्र शासनातील मंत्रीगण, खासदार आणि आमदार आदिंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी सर्वप्रथम पंतप्रधान मोदी हे देवी जगदंबा माता तसेच जगतगुरु संत सेवालाल महाराज व राष्ट्रसंत डॉ रामराव बापू महाराज यांच्या समाधीस्थळी उपस्थित राहून दर्शन घेणार आहेत. त्यानंतर बंजारा विरासत नंगारा वास्तू लोकार्पण सोहळा त्यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे. भव्य सभा स्थळी दाखल झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील शंभर शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.