बुलढाणा (Pro. Dr. Sadanand Deshmukh) : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे नव्याने गठन करण्यात आले असून, त्यात बुलढाणा येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा ‘बारोमासकार’ प्रा. डॉ. सदानंद देशमुख यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, या मंडळाचे अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे असून, एकूण 24 साहित्यिकांची सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाने वर्णी लावली आहे.
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर 15 ऑक्टोबर 2024 पासून पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाच्या पुढील आदेशापर्यंत 24 जणांची समिती नेमण्यात आली असून, त्यात महाराष्ट्राचे विविध भागातील साहित्यिक व कवींची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सदानंद मोरे- अध्यक्ष, प्रदीप ढवळ- उपाध्यक्ष तर अन्य 22 सदस्यांच्या नामावलीमध्ये प्रा. डॉ. सदानंद देशमुख (Pro. Dr. Sadanand Deshmukh) यांचाही समावेश आहे.
प्रा. डॉ. सदानंद देशमुख हे मराठी कथा व कादंबरीक्षेत्रातलं एक नामवंत नाव असून, त्यांच्या बारोमास या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. या कादंबरीचे इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषांसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. बारोमास कादंबरीवर हिंदी चित्रपट निघाला आहे. ‘बारोमास’ वर एक मराठी नाटकही आले असून त्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय त्यांची गाजलेली दुसरी कादंबरी म्हणजे तहान, या कादंबरीवरही मराठी रंगमंचावर नाटक आले आहे. याशिवाय चारीमेरा या कादंबरीसह अनेक ग्रामीण कथा मराठी साहित्य विश्वात त्यांच्या नावाजलेल्या आहेत. काही कथांवर मालिका सुद्धा आलेल्या आहेत. नुकतीच त्याची बारोमास कादंबरी नागपूर विद्यापीठात अभ्यासक्रमाला लागलेली असून, अनेक कथासंग्रह त्यांची काही विद्यापीठात अभ्यासक्रमाला लागलेले आहेत.
अशा साहित्यिकांची निवड महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळावर होणे, ही बुलढाणा जिल्हा साहित्य विश्वासाठी आनंदाची व गौरवास्पद बाब आहे !